काळा पैसा असणार्‍यांवर कोसळणार कुर्‍हाड - स्विसमधल्या खातेधारकांची माहिती गोळा करणे सुरू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
नवी दिल्ली,
काळा पैसा लपविण्यासाठी स्विस बँकेत खाते उघडणार्‍या आणि तेथे आपला काळा पैसा जमा करणार्‍या भारतीय खातेधारकांची माहिती भारत सरकारला लवकरच मिळणार आहे. स्वित्झर्लंडच्या अधिकार्‍यांनी यासंदर्भातील कारवाईला सुरुवात केली आहे. स्विस अधिकार्‍यांनी एचएसबीसी बँकेत खाते असलेल्या भारतीय लोकांना यासंबंधी एक लिखित स्वरूपात नोटीसही पाठवली आहे.
 
 
 
 
 
 
 
एका वृत्तानुसार, ऑगस्ट 2008 मध्येच स्वित्झर्लंडच्या फेडरल कोर्टाच्या निर्णयानंतर स्विसमधल्या खातेधारकांची माहिती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जवळपास दीड महिन्यांपूर्वी स्विस बँकेत खाती असलेल्या भारतीय खातेधारकांना फेडरल टॅक्स अॅडमिनिस्ट्ररेशनकडून नोटीसही पाठवण्यात आली होती. भारताकडून मागणी करण्यात आलेल्या काळा पैशाची माहिती ही दोन्ही देशांच्या द्विपक्षीय करारांतर्गत येते. नोटीसमध्ये एप्रिल 2011पासून खातेधारकांना माहिती देण्यास सांगण्यात आले होते.
 
 
 
 
फेडरल बँकेच्या आदेशानंतर भारतीय खातेधारकांना एक सहमती पत्रही भरण्यासाठी सांगण्यात आले होते. भारतीय अधिकार्‍यांनी मागितलेल्या सूचना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही या पत्रात लिहिले आहे. 2011 मध्ये फ्रान्सकडून भारताला स्वित्झर्लंडच्या एचएसबीसी बँकेतील खातेधारकांच्या 628 भारतीयांची नावे मिळाली आहेत. त्यानंतर 2015मध्ये केलेल्या खुलाशामध्ये 1195 भारतीयांची नावे समोर आली होती. 2006-07 मध्ये स्विस बँक खात्यांमध्ये भारतीय खातेधारकांचे जवळपास 25,420 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. यातील 85 लोक भारतीय नागरिक आहेत. तसेच त्यांचे एक मिलियन डॉलर्स पैसे या खात्यांमध्ये जमा आहेत. तत्पूर्वी, फ्रान्सने एचएसबीसीमध्ये जवळपास 700 भारतीयांच्या खातेधारकांची माहिती ऑगस्ट 2011ला दिली होती. त्यानंतर जगभरातल्या इतर देशातील सरकारांनीही कारवाई केली होती.