ऑस्ट्रेलियात आले भीषण पूरसंकट - हजारो घरांना धोका, रस्त्यांवर मगरींचा संचार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
कॅनबेरा,
उत्तर ऑस्ट्रेलियात भीषण पुराचे संकट निर्माण झाल्याने हजारो लोकांनी घरदार सोडून सुरक्षितस्थळी आश्रय घेतला आहे. पुराच्या पाण्यामुळे 20 हजार घरांनाही धोका निर्माण झाला आहे. रॉस नदी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पुराची तीव्रता वाढली असून मदतकार्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले आहे.
 
 
 
पुढील काही दिवसांमध्ये स्थिती आणखीन बिघडण्याची भीती अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या मगरी रस्त्यांवर मुक्त संचार करीत असल्याने प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे. शाळा आणि कार्यालयांसह विमानतळ देखील बंद ठेवण्यात आले आहे. पुरासह भूस्खलन होत असल्याने स्थिती आणखीन बिघडत असल्याचे सांगण्यात आले.
 
 
 
टाउन्सव्हिलेमध्ये पाणीच पाणी
क्विन्सलॅण्ड राज्याच्या टाउन्सव्हिले शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. अनेकांनी स्वत:च्या घराच्या छतांवर आसरा घेतला आहे. शहराचा उर्वरित भागांशी असलेला संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच पुरामुळे स्थिती आणखीन बिघडू शकते, असा इशारा स्थानिक हवामान विभागाने दिला आहे.
 
 
शतकातील भीषण पूर
यंदासारखी एवढी मोठी पूरस्थिती 100 वर्षांमध्ये निर्माण झाली नव्हती, असे नागरिकांचे म्हणणे असून पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसासह वेगवान वारे वाहण्याचे शक्यता पाहता आवश्यकता भासली तरच बाहेर पडा अन्यथा घरीच थांबा, असे आवाहन क्विन्सलॅण्डच्या प्रशासनाने केले आहे.
पुराचे पाणी घरात शिरल्याने शेकडो घरे रिकामी करण्यात आली असून 10 ते 20 हजार घरांना पुराच्या पाण्याचा धोका आहे. सैन्याने पाण्यापासून बचाव करण्यासाठी स्थानिक लोकांना वाळूच्या पोत्यांचे वाटप केले आहे. या भागात वर्षाला सरासरी 2 मीटर पाऊस पडतो, परंतु काही भागांमध्ये वर्षभराइतका पाऊस काही दिवसांमध्येच पडला आहे. इंघम भागात मागील 24 तासात 50.6 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तेथे एका तासातच 14.5 सेंटीमीटर पाऊस पडल्याची माहिती हवामानतज्ज्ञ जोनाथन यांनी दिली.
 
 
 
नागरिक हवालदिल 
सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून घरात एक मीटरहून अधिक उंचीपर्यंत पाणी भरल्याने घरातील अनेक वस्तू पाण्यावर तरंगत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.