टोटल धमालमधील ‘मुंगडा’ गाणे प्रदर्शित
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
सध्या सगळीकडे अजय देवगणच्या आगामी ‘टोटल धमाल’ चित्रपटाचीच चर्चा आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटातील मुंगडा हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.
 
 
 
सोनाक्षी सिन्हा ‘मुंगडा’ या गाण्यात अजय देवगणसोबत थिरकताना दिसत आहे. टोटल धमालमध्ये विनोद खन्ना यांच्या ‘इन्कार’ चित्रपटातील ‘मुंगडा’ या हिट गाण्याचे रिमेक करण्यात आला आहे. विनोद खन्ना यांच्या चित्रपटातील या गाण्यावर सुपरहिट डान्सर हेलन यांनी डान्स केला होता. या गाण्याला इंदर कुमार यांच्या ‘टोटल धमाल’ चित्रपटात वेगळा टच देण्यात आला आहे. हे गाणे गौरव- रोशीन यांनी कम्पोज केले असून आदिल शेख याने कोरिओग्राफ केले आहे. या गाण्यात सोनाक्षीसोबत अजय देवगणही थिरकताना दिसत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अर्शद वारसी आणि रितेश देशमुख यांच्या आगामी ‘टोटल धमाल’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. धमाल चित्रपटाच्या सिरीजमधील हा तिसरा चित्रपट आहे. इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यावेळी धमालची मजा तिप्पट होणार आहे. या चित्रपटात यावेळी सिंहापासून ते सापापर्यंत आणि सायकलपासून ते हॅलिकॉप्टरपर्यंत सारे काही दिसणार आहे. विनोदी पटात गणती करण्यात आलेल्या टोटल धमाल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे. या चित्रपटातही आधीच्या चित्रपटाप्रमाणे सर्व कलाकार मंडळी ५० कोटी रुपयांच्या पाठीमागे धावताना दाखवले आहेत. चित्रपटात अनिल आणि माधुरी गुजराती जोडपे दाखवण्यात आले आहेत. तगड्या विनोदी कलाकारांसोबत माकड क्रिस्टलही यात झळकणार आहे. याआधी क्रिस्टलने अनेक हॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे. येत्या २२ फेब्रुवारीला टोटल धमाल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.