प्रियांकांना राहुल गांधींच्या शेजारची केबिन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
कॉंग्रेसच्या महासचिवपदी नुकतीच निवड झालेल्या प्रियांका गांधी वढेरा यांना दिल्लीतील 24, अकबर रोडवरील कॉंग्रेस मुख्यालयात केबिन मिळाली आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या शेजारची केबिन त्यांना देण्यात आली आहे. महासचिवपदी असताना राहुल यांना जी केबिन देण्यात आली होती, त्या केबिनमध्येच आता प्रियांका बसणार आहेत.
कॉंग्रेसने प्रियांकांना पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. कॉंग्रेसमध्ये प्रियांकांची काय भूमिका असेल, त्यावर राहुल चर्चा करणार आहे.
 

 
 
राहुल यांनी शनिवारी दिल्लीत कॉंग्रेसचे सर्व प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यात निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. प्रियांकांनीही कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांची भेट घेऊन पूर्व उत्तर प्रदेशातील निवडणूक रणनीतीवर चर्चा केल्याचे समजते.
 
 
उद्या बैठकीत पहिल्यांदा होणार सहभागी
कॉंग्रेसच्या नवनियुक्त महासचिव व पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी या आपल्या विदेश दौर्‍यावरून परतल्या आहेत. अमेरिकेहून परतल्यावर प्रियांका या राहुल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या. त्यांनी पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य िंशदे यांचीही भेट घेतली.
 
 
 
कॉंग्रेस महासचिवपदी प्रियांका यांच्या नियुक्तीनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. मुलीच्या उपचारासाठी अमेरिकेला गेलेल्या प्रियांका गांधी यांच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी यांनी पक्षाच्या महासचिवांसह राज्यांमधील प्रभारींची गुरुवार 7 फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित केली आहे. महासचिव म्हणून प्रियांका गांधी या बैठकीत सहभागी होतील. महासचिवांच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांबरोबर शनिवार 9 फेब्रुुवारी रोजी बैठक बोलावली आहे. यात प्रदेश कॉंग्रेसच्या तयारीबाबत चर्चा होईल.
 
 
 
त्याआधी कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेेले राहुल गांधी हे बहीण प्रियांका यांच्यासह प्रयागराज येथे सुरू असलेल्या अर्धकुंभ मेळ्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथील कुंभ क्षेत्रात प्रियांका यांना गंगाची मुलगी म्हणणारे पोस्टर्स लावण्यात आले होते.