ममता बॅनर्जीकडून प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग - स्मृती इराणी यांचा आरोप
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
नवी दिल्ली,
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करत लोकशाही प्रक्रियेत अडथळा आणत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या स्मृती इराणी यांनी आज मंगळवारी केला. सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी यांच्या दादागिरीला लगाम लावल्याचे आजच्या निर्णयावरून स्पष्ट होते, असे इराणी यांनी सांगितले.
 
 
 
 
 
 
 
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत स्मृती इराणी यांनी बंगालमधील सीबीआय कारवाईच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले. बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती ठिक नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट होते. न्यायालयाने बंगाल सरकारला आपल्या निर्णयातून फटकारले आहे. तृणमूल कॉंग्रेस सीबीआय कारवाईला करत असलेला विरोध फसवा आणि दिशाभूल करणारा आहे, असे त्यांनी सांगितले.
 
 
 
बंगालमधील जनतेचा भाजपाच्या नेत्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून ममता बॅनर्जी यांच्या पोटात दुखू लागले, आपल्या सत्तेला भाजपापासूनच खरा धोका असल्याची जाणिव ममता बॅनर्जी यांना झाली आहे, त्यामुळे त्या राजकारणाच्या खालच्या पातळीवर उतरल्या असल्याचा आरोप इराणी यांनी यावेळी केला. अराजकतावादी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला आपली चौकशी करू दिली नाही, तसेच सीबीआय अधिकार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आले, असे इराणी यांनी सांगितले.
 
 
 
 
सीबीआयला चौकशीत सहकार्य करण्याचे तसेच या चौकशीसाठी शिलॉंगला जाण्याचे निर्देश न्यायालयाने कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीवकुमार यांना दिले आहे, याचाच अर्थ राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती ठीक नाही, राज्यात या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही, हे यावरून दिसून येते, असे इराणी यांनी स्पष्ट केले. न्यायालय अवमानाच्या प्रक्रियेत राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि कोलकाताच्या पोलिस आयुक्तांना न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे, याकडे इराणी यांनी लक्ष वेधले.