दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019

 
 
वाशीम :
भरधाव वेगात येणार्‍या दुचाकी चालकाने मागून जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रिसोड तालुक्यातील सवड नजिक असलेल्या शासकीय वसतीगृहाजवळ काल सोमवार, ४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
 
प्राप्त माहितीनुसार, अनिरुद्ध भगवान शेळके व त्यांचा भाऊ भीमराव भगवान शेळके रा.सवड ता. रिसोड जि. वाशीम हे ४ फेब्रुवारी रोजी ९ वाजताच्या सुमारास आपल्या शेतात पिकांच्या राखणीकरिता चालले होते. यादरम्यान भरधाव वेगात आलेल्या एम.एच. ३७ पी १३६४ क्रमांकाच्या दुचाकीने भीमराव शेळके यांना मागून जबरदस्त धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर वाहन चालक राजकुमार सरकटे हा वाहनासह दुरपर्यंत घासत गेल्याने त्यालाही गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला.
 
याप्रकरणी मृत भीमराव शेळके यांचा भाऊ अनिरुद्ध भगवान शेळके यांनी रिसोड पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरिभाऊ कुलवंत करीत आहेत.