13 आकडी रोस्टरवरून राज्यसभेत गदारोळ, कामकाज स्थगित
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
नवी दिल्ली,
देशभरातील विद्यापीठात तसेच महाविद्यालयात 13 आकड्यांची रोस्टर प्रणाली लागू करण्याच्या मुद्यावरून आज बुधवारी राज्यसभेत गदारोळ झाला, यामुळे सभागृहाचे कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
 
 
 
13 आकड्यांच्या रोस्टरप्रणालीचा फटका प्राध्यापकांच्या नियुक्त्यांमधील राखीव जागांना बसणार असल्याचा विरोधी सदस्यांचा आरोप होता. यामुळे सपा, बसपा, राजद तसेच अन्य पक्षांचे सदस्य वेलमध्ये आले होते. त्यामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपयर्र्त स्थगित केले.
 
 

 
 
 
दुपारी 2 वाजता कामकाज सुरू होताच उपसभापती हरिवंश नारायणिंसह यांनी गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांना 125 वे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याची सूचना केली. गोंधळातच रिजिजू यांनी घटनादुरुस्ती विधेयक सादर केले. हरिवंश नारायणिंसह यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा सुरू करण्यासाठी भाजपाचे भूपेंद्र यादव यांचे नाव पुकारले; मात्र त्याचवेळी सपा, बसपा, राजद आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सदस्यांनी आपल्या हातात पोस्टर्स घेऊन वेलमध्ये धाव घेत घोषणाबाजी सुरू केली.
 
 
 
200 आकड्यांचे रोस्टर पुन्हा लागू करण्याची या सदस्यांची मागणी होती. 13 आकडी रोस्टर्समुळे दलित, आदिवासी आणि अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षणावर प्रतिकूल परिणाम झाला असल्याचा आरोप सपाचे रामगोपाल यादव यांनी केला. या निर्णयाच्या विरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र ती न्यायालयाने फेटाळली, त्यामुळे सरकार पुन्हा पुनरीक्षण याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले. यामुळे सदस्यांचे समाधान झाले नाही. सभागृहातील गोंधळ शांत होत नसल्यामुळे हरिवंश नारायणिंसह यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.
 
 
 
विभाग आणि महाविद्यालय यांना युनिट मानत अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोनशे आकड्यांचे रोस्टर्स रद्द केले होते. याचा परिणाम म्हणून आरक्षित जागा कमी होणार असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप होता.