स्मृतीच्या अर्धशतकानंतरही भारतीय महिला संघाचा पराभव
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 

 
 
वेलिंग्टन,
भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिने आज न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात २४ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम रचला. मात्र, मंधानाच्या उत्कृष्ट खेळानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
 
न्यूझीलंडच्या महिला संघाने सलामीची फलंदाज सोफी डिवाइनच्या (६२) अर्धशतकाच्या जोरावर २० षटकात ४ गडी गमावित १५९ धावा केल्या. भारतीय संघ मात्र १९.१ षटकात केवळ १३६ धावा करू शकला.
 
 
 
मंधानाने स्वत:चाच विक्रम मोडला असून यापूर्वी तिने गतवर्षी मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. या अर्धशतकी खेळीत तिने ६ चौकार व ३ षटकार खेचले. मंधाना ५८ धावा काढून बाद झाली.
 
महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या सोफी डिवाइनच्याच नावे आहे. तिने २००५मध्ये भारताविरुद्ध १८ चेंडूत अर्धशतक नोंदविले होते.
 
  
 
वन-डे मालिकेत २-१ असा विजय मिळविल्यानंतर भारतीय महिला संघ आज पासून न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळत आहे. भारताची कर्णधार हरमनप्रित कौर हिने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीची संधी दिली. न्यूझीलंड संघाने सलामीची फलंदाज सोफी डिवाइनच्या ६२ धावांच्या जोरावर निर्धारित २० षटकांमध्ये ४ बळी देत १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा संघ १३६ धाव शकला. भारताला २३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.