गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आढळले ९ तृणभक्षींचे मृतदेह
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
- बिबट्याने शिकार केल्याचा प्रशासनाचा दावा
 
नागपूर,
शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणार्‍या गोरेवाडा प्राणीसंग्रहालय अर्थात वन्यप्राणी बचाव केंद्रात आज सकाळी एक वाईट घटना उघडकीस आली. या प्राणीसंग्रहालयात चार चितळ, ४ काळवीट आणि एक बारशिंगा असे एकून नऊ तृणभक्षी मृत अवस्थेत आढळून आले. परिसरातील जंगलात वावर असलेल्या बिबट्याने या तृणभक्षींची शिकार केल्याचा दावा गोरेवाडा प्रशासनाने केला असला तरी, या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. वन्यजीवप्रेमींनी यामध्ये कुठेतरी पाणी मुरतेय अशी शंका व्यक्त केली आहे.
 
 
 
२०१५ मध्ये ज्यावेळेस गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्राची सुरुवात झाली, त्यादरम्यान अवघ्या काही महिन्याने यात डिअर १ या भागात ३ काळवीट ठेवण्यात आले होते. मात्र १४ व १५ एप्रिल २०१६ या दोन दिवशी येथे तीन काळवीट मारले गेले होते. डिअर इनक्लोजरमध्ये उघड्या असलेल्या क्रॉलमध्ये चढून विबट्याने काळवीटांना मारले, असे तपासात निष्पन्न झाले होते. तेव्हापासून उघड्या क्रॉलमध्ये तृणभक्षींना ठेवणे बंद झाले होते. परंतु गेल्या महिन्यात या प्राणीसंग्रहालयात क्रॉलवर सोलर कुंपण घालून तो परत सुरू करण्यात आला. सौर कुंपणाच्या आराखड्यानुसार बिबट जातीच्या प्राण्याला उंच उडी घेणे व वर चढणे शक्य होणार नाही, त्यानुरूप हे कुंपण तयार करण्यात आले होते. एवढेच नाही तर क्रॉलच्या बाहेर कॅमेरेदेखील लावण्यात आले होते. मात्र बुधवारी सकाळी या क्रॉलची पाहणी केली असता यामध्ये हे ९ प्राणी मृतावस्थेत आढळून आले.
 
दरम्यान, सदर प्राण्यांचे शवविच्छेदन बुधवारी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केले. या अहवालानुसार यातील चार चितळ, दोन काळवीट आणि १ बारशिंगा यांचा मृत्यू श्वसन व हृदयक्रिया बंद झाल्यामुळे तर एका काळवीटाचा मृत्यू श्वसन क्रिया बंद पडल्यामुळे झाला असे दिसून आले. चौथ्या काळवीटाच्या शरीराचा बराचसा भाग खाल्ला असल्याचे दिसून आले. त्यामुळे या परिसरात वावर असलेल्या बिबट्याने या प्राण्यांची शिकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे मत गोरेवाडा प्रशासनाने व्यक्त केले. सदर कार्यवाही गोरेवाडा विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. पी. भिवगडे, वन्यप्राणी बचाव केंद्राचे वनपाल पी. एम. चौहान, वनरक्षक आर. एच. वाघाडे, डॉ. व्ही. एम. धुत, डॉ. पी. एम. सोनकुसळे आदींच्या उपस्थितीत झाली.
आमचीच चूक झाली
सन २०१६ मध्ये अशी घटना घडल्यानंतर या ठिकाणी मागच्या महिन्यात सर्व विचार करून विद्युत आणि सौर कुंपण करण्यात आले. तरी देखील येथे शिरून बिबट्याने शिकार केली. यासंदर्भात पाहणी सुरू असून, बिबट्या नेमका कोणत्या भागातून आत गेला याचा तपास सुरू आहे. बिबट्या आत शिरला आणि त्याला बाहेर पडायला वाट मिळाली नाही, तर तो त्याच्या वाटेत जेवढे प्राणी येतील त्या सर्वांना ठार करतो. त्यातूनच ही घटना घडली असावी. यापुढे अशी घटना होणार नाही यावर पूर्णपणे लक्ष दिले जाणार आहे.
- नंदकिशोर काळे, विभागीय व्यवस्थापक, गोरेवाडा प्रशासन