जवान सुनील धोपे यांच्या कुटुंबीयांचे उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरूच!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019

वाशीम,
मेघालय राज्यातील सिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर असताना जवान सुनील विठ्ठलराव धोपे (वय ३७) यांचा १५ सप्टेंबर २०१८ रोजी संशयास्पदरित्या मृतदेह आढळून झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सीमा सुरक्षा दलातील संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांविरूद्ध कारवाई व्हावी यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धोपे यांच्या पत्नी व वृद्ध आईने ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण ६ फेब्रुवारी रोजी तिसर्‍या दिवशीही सुरूच होते.
 

 
 
सुनील धोपे यांची हत्या झाल्याचा आरोप करून धोपे कुटुंबियाने त्यास कारणीभूत असणार्‍या सीमा सुरक्षा दलातील पाच अधिकारी, कर्मचाजयांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करावा, यासह अन्य मागण्या लावून धरल्या होत्या. याप्रकरणी कारंजा पोलिसांत ‘झीरो एफआयआर’ अंतर्गत सीमा सुरक्षा दलातील संबंधितांविरूद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून प्रकरण सिलाँग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करित मृतक सुनील धोपे यांच्या आई लक्ष्मीबाई धोपे व पत्नी सविता धोपे यांनी ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरूवात केली. मात्र, उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.