सायकल आंदोलनाने अमरावती विद्यापीठात तणाव
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019

 
  
 
- कुलगुरु व अभाविपमध्ये खडाजंगी
- एमबीएच्या निकालावरून विद्यार्थी संतापले
अमरावती, 
एमबीएच्या विद्यार्थ्यांना पाच विषयात फेरमूल्यांकनाची संधी देण्यात यावी, यासह विविध प्रश्‍नांवरून आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये (अभाविप) चांगलीच खडाजंगी झाली. विद्यापीठात सुमारे दोन तास कुलगुरु व आंदोलक यांच्यात शाब्दीक चकमक सुरु होती. विद्यापीठ प्रशासन व कुलगुरु विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवित नसल्याच्या आरोप आंदोलकांनी केला. यवतमाळ येथील जाजू महाविद्यालयातील एमबीएच्या ५० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ४९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. परीक्षा संचालक याबाबत गंभीर नसल्याचा आरोप करीत आज अभाविपचे विदर्भ सहप्रांतमंत्री ज्ञानेश्‍वर खुपसे व अन्य कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यापीठात धडकले. विद्यार्थी सायकल आंदोलन करणार असल्याची माहीती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
आंदोलकांना प्रवेशद्वाराजवळ रोखण्यात आले. परंतु ज्ञानेश्‍वर खुपसे व आंदोलकांनी प्रवेशद्वार बळजबरीने उघडण्यास सुरुवात केल्याने विद्यापीठ प्रशासन, सुरक्षा रक्षकांनी नमते घेतले. यानंतर जोरदार घोषणा देत आंदोलक कुलगुरुंच्या दालनासमोरील सभागृहात पोहोचले. यावेळी एका आंदोलकाने सायकल सोबत आणली होती. परीक्षा संचालक डॉ. हेमंत देशमुख यांच्यासोबत चर्चा करण्यास विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे नकार दिला. यानंतर कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर चर्चेसाठी पोहोचले.
 
एमबीएच्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याने त्यांच्या पाचही विषयाचे पुर्नमूल्यांकन करावे असा आग्रह विद्यार्थ्यांनी धरला. परंतु याबाबत आपण काहीच करू शकत नाही. राज्यपालांचा हा निर्णय असल्याने यात बदल शक्य नसल्याचे म्हटले. येथूनच कुलगुरु व विद्यार्थ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात असल्याने कुलगुरुंनी यात तोडगा काढावा, अशी मागणी केली. परंतु यावर काही होऊ शकत नसल्याचे म्हणताच आंदोलक संतापले. विद्यापीठात मूल्यांकन योग्यपणे होत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आक्षेप आंदोलकांनी घेतला. विद्यार्थ्यांसमोर नोकरीचा बिकट प्रश्‍न निर्माण होत आहे. मूल्यांकनात हयगय करणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आंदोलकांचा आवाज वाढल्याने कुलगुरुंनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. कुलगुरुंवर ते काहीच काम करीत नसल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी कुलगुरुंनी आपण काहीच करत नसल्याचे उपरोधिक उत्तर दिले. यामुळे आंदोलक तापले. कुलगुरुंनी आंदोलकांना शांत राहून बोलण्याचे सांगितले. परंतु तुम्ही आवाज वाढवून बोला तर तशीच प्रतिक्रिया मिळणार असे आंदोलकांनी म्हटले. जवळपास तीन तास हा प्रकार सुरु होता. दरम्यान, कुलगुरु व संघटनेच्या वादामुळे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी देखील सभागृहात जमले होते.
 
मागण्यांवर झाली दीर्घ चर्चा
आंदोलक चर्चा करतांना उग्र होत असल्याने ही चर्चा दीर्घ झाली. एमबीएच्या पाच विषयाचे पूर्नमूल्यांकन करावे, पार्कीग शुल्क आकारण्यात येवू नये, विद्यापीठात जीमखाना सुरु करण्यात यावा, विद्यापीठातील वाचनालयात स्वत:चे पुस्तक ठेवण्याची अनुमती देण्यात यावी, आदी मागण्या मांडण्यात आल्यात. कुलगुरुंनी यावर सकारात्मक उत्तर दिले.
 
आरोप करू नका
चर्चेदरम्यान आंदोलकांनी कुलगुरुंवर खुर्च्यां तोडण्यासोबत काही आक्षेपार्ह आरोप केले. यावर कुलगुरुंनी तुम्हीही कसलेही आरोप करू नका, आपण अजीबात खपवून घेणार नाही, असे सांगितले. परंतु विद्यापीठ आमचे असल्याने आम्ही बोलणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. विद्यार्थ्यांसाठी तुम्ही येथे आहात, तुम्हाला वेतन मिळते, असे आक्रमक विधान आंदोलक करीत होते. विद्यार्थ्यांचा संताप वाढत गेल्याने कुलगुरुंनी देखील आपण काहीह खपवून घेणार नाही, तोल सांभाळून व शांत बोलण्याचा सल्ला दिला.