विदर्भ पुन्हा अजिंक्यपदाच्या समीप
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
- रणजी करंडक स्पर्धा अंतिम लढत
- सौराष्ट्र दुसरा डाव ५ बाद ५८
 
 
निखिल केळापुरे
नागपूर,
फैझ फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भाचा संघ सलग दुसर्‍यांदा रणजी करंडकाच्या समीप येऊन पोहोचला आहे. पहिल्या डावात ५ धावांची निसटती आघाडी मिळविणार्‍या विदर्भाने दुसर्‍या डावात २०० धावा नोंदविल्या आणि सौराष्ट्रसमोर विजयासाठी २०६ धावांचे लक्ष्य ठेवले. धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेरीस सौराष्ट्रने २८ षटकात चेतेश्वर पुजारा व शेल्डन जॅक्सन या महत्त्वपूर्ण मोहर्‍यांसह ५ गडी गमावत ५८ धावांची नोंद केली. त्यामुळे उर्वरीत पाच फलंदाज त्वरीत बाद करुन स्पर्धेत विदर्भ इतिहास रचणार काय याकडे सर्व विदर्भ क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य लागले आहे.
 
 
 
जामठ्याच्या व्हीसीए मैदानावर तिसर्‍या दिवशी दोन गडी गमावित ६० धावांची आघाडी घेणार्‍या विदर्भ संघाकडून चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात वासीम जाफर व गणेश सतीशने २ बाद ५५ धावांवरुन पुढे केली. कालचे नाबाद खेळाडू गणेश सतीशने आपल्या वैयक्तिक धावसंख्येत ११ धावांची, तर वसीम जाफरने ६ धावांची भर घातली आणि बाद झालेत. त्यावेळी विदर्भाची स्थिती ४ बाद ७२ धावा अशी होती. मात्र त्यानंतर अमरावतीच्या मोहित काळेने ३८ धावांचे, तर आदित्य सरवटेने ४९ धावांचे योगदान देत विदर्भाला दुसर्‍या डावात २०० धावांचा टप्पा गाठून देण्यात यश मिळविले. सौराष्ट्रच्या डावखुरा फिरकीपटू धर्मेंद्रसिन्ह जडेजाने ६ बळी टिपले.
 
विदर्भ संघाची धावसंख्या ७१ झाली असतांना वसीम जाफरला (११) धर्मेंद्रसिन्ह जडेजाने अवी बारटकडून झेलबाद केले. त्यानंतर संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर पडत नाही तोच गणेश सतीश जडेजाच्या गोलंदाजीत झेलबाद झाला. त्यामुळे पुढे फलंदाजीला आलेल्या मोहीत काळे आणि वाडकर यांनी संघासाठी धावा उभारण्याचा प्रयत्न करीत केला, मात्र अक्षय वाडकर भोपळा न फोडताच उनाडकटच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यामुळे अवघ्या धावसंख्येवर विदर्भाचा अर्धा संघ माघारी परतल्याने विदर्भ बॅकफुटवर आला. दरम्यान, मोहीत काळे व अक्षय कर्णेवारने संघासाठी ३२ धावांची भर घातली, परंतु संघाची धावसंख्या १०५ झाली असताना कर्णेवारला १८ धावांवर मकवानाने हार्विक देसाईकडून झेलबाद केले.
 
दरम्यान काळेने एका बाजूने संघाचा डाव सावरुन ठेवला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या आदित्य सरवटेनेे काळेच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी संघासाठी २९ धावा जोडल्या. परंतु संघाची धावसंख्या १३४ झाली असताना मोहीत काळेला ३८ धावांवर मकवानाने पायचित केले. पुढे फलंदाजीला आलेल्या सरवटे याने वखरेच्या साथीने संघाची धावसंख्या वाढविण्याच्या प्रयत्नात असताना वखरेला अवघ्या एका धावेवर जडेजाने चालते केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या उमेश यादव याने सरवटेच्या साथीने जडेजाच्या एकाच षटकांत एक षटकार आणि एक चौकारासह १२ धावा काढल्या. संघासाठी दोघांनी नवव्या गड्यासाठी ३१ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतु चेतन सकारियाच्या षटकांत उमेश यादव त्रिफळाचित झाला. त्यावेळी विदर्भ संघाची ९ बाद १७८ धावा अशी स्थिती झाली होती. शेवटच्या विकेटसाठी फलंदाजीला आलेल्या गुरबानी याने सरवटेला सुरेख साथ देत संघासाठी महत्वपूर्ण २२ धावांची भागीदारी करीत संघाची धावसंख्या दोनशे केली. मात्र ४९ धावांवर असतांना सरवटे जडजेच्या चेंडूवर पायचित झाला. त्यामुळे विदर्भ संघाने २०६ धावांचे विजयी लक्ष्य सौराष्ट्र संघासमोर ठेवले. 
या लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या उद्देशाने सलामीला फलंदाजीला आलेल्या हार्विक देसाई आणि स्नेल पटेल यांनी संघासाठी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. परंतु संघाची धावसंख्या १९ झाली असतांना स्नेल पटेलला सरवटेने जाफरकडे झेलबाद केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या विश्वराज देसाई याने देसाईच्या साथीने केवळ तीन धावा जोडल्या असतांना परत सरवटेने देसाईला स्वत: झेल घेवून बाद केले. पुढे फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजारा याने सावध खेळीचा पवित्रा घेतला. परंतू सरवटे याने पुजाराला भोपळाही न फोडू देता पायचीत करीत विदर्भ संघाला तिसरे यश यश मिळवून दिले. दरम्यान फलंदाजीला आलेल्या अर्पित वसावडे याने जडेजाच्या साथीने संघाचा धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतू ते अपयशी ठरले. वसावडेला वेगवान गोलंदाज उमेश यादव याने यष्टीमागे झेलबाद करीत सौराष्ट्रला चौथा धक्का अवघ्या ३५ धावांवर दिला. यानंतर फलंदाजीला आलेल्या शेल्डन जॅक्सनला वखरेने त्रिफळाचित केल्याने सौराष्ट्रला ५५ धावांवर पाचवा धक्का बसला. दिवसाखेर सौराष्ट्रने ५८ धावांवर पाच गडी गमावले असून कमलेश मकवाना आणि विश्वराज जडेजा नाबाद आहे. गोलंदाजीत सरवटेने ३, तर यादव व वखरे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.