सूर नदीच्या पात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताची शक्यता
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019

 
 
 
 
वरठी, 
नेरी येथील सूर नदी पात्रात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. नदी पात्राच्या मधोमध मृतदेह आढळल्याने गावकऱ्यांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. वरठी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तपासणी करिता ताब्यात घेतला आहे. मृतकाचे ओळख पटली असून मोहाडी येथील नरेश लांजेवार (४८) नाव आहे. पत्नीच्या तक्रारीनुसार वरठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
  
वरठी पासून ३ किमी असलेल्या नेरी गावातील शमशान घाट सूर नदीच्या पात्रजवळ आहे. नदी पत्रातून मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन करण्यात येते. आज नदी पात्रातून रेती उत्खनन करताना नदीच्या मध्यभागातून मानवी शरीर अवयव असलेले भाग निदर्शनास आले. सरपंच आनंद मलेवार यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. मृतदेह असल्याची माहिती मिळताच वरठी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एस. बी. ताजने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर जागा पोखरून काढली. त्या मृतदेहाची लांबी ५ फूट व साधारणतः ५० च्या जवळपास वय असल्याचे जाणवले. मृतदेह हा कुजलेल्या स्थितीत असल्याने ओळख पटू शकली नव्हती. याबाबद अधिक शोध घेतला असता मोहाडी पोलीस ठाण्यात अंतर्गत १६ जानेवारी २०१९ पासून मोहाडी येथील नरेश लांजेवार घरून गायब असल्याचे कळले. त्यानुसार त्याच्या नातेवाईकांना पाचारण करण्यात आले. मृतकाचे कपडे व इतर साहित्यावरून मृतक नरेश लांजेवार असल्याची ओळख पटली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्याकरिता पाठवला आहे.
  
सध्या गावात मृत शरीर पुरण्याची प्रथा प्रचलित नाही. आणि मृतदेह पुरले तरी नदीच्या मध्यभागी कुणी पुरत नाही. त्यामुळे घातपात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. वरठी पोलीस तपास करीत आहे. मृतदेह बाहेर काढताना त्याचा जवळ खिशातील पाकीट मिळाले आहे. यात २० रुपयाच्या नोटा, रेल्वेचे तिकीट आणि काही कागद सापडलेत. यावरून लवकरच शोध लागण्याची शक्यता आहे.