शहीद औरंगजेब हत्या प्रकरण; ' राष्ट्रीय रायफल्स ' चे तीन जवान ताब्यात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 

 
 
 
 
जम्मू-काश्मीर मध्ये गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी शौर्य चक्र विजेता शहीद जवान औरंगजेब यांचे अपहरण करून हत्या केली होती. यांच्या हत्येप्रकरणी भारतीय सैन्याने राष्ट्रीय रायफल्सच्या तीन जवानांना ताब्यात घेतले आहे. या तिघांनी औरंगजेबविषयीची माहिती दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवल्याचा संशय असून याप्रकरणी अजूनही चौकशी सुरु असल्याचे सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 
 
 
 औरंगजेबच्या हत्येप्रकरणी अबिद वानी, तजमूल अहमद आणि अदिल वानी अशी तिघांना भारतीय सैन्याच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या तिघांनी औरंगजेबविषयीचा तपशील उघड केल्याचा संशय आहे. या प्रकरणी अद्याप चौकशी सुरु असल्याचे सैन्यातील सूत्रांनी सांगितले.
 
 
ताब्यात घेतलेल्या अहमदला भारतीय सैन्याच्या चौकशी पथकाने बेदम मारहाण केल्याचा आरोप अहमदच्या कुटुंबीयांनी केले  आहे. ‘पुलवामा येथील राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पमध्ये अहमदला बोलावण्यात आले होते. तिथे अहमदला बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर त्याला रस्त्यालगत सोडून दिले. स्थानिकांनी जखमी अहमदला रुग्णालयात दाखल केले’, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सध्या अहमदची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भारतीय सैन्याच्या रडारवर असलेल्या तीन पैकी एक जवान हा कुलगाम तर दोन जण पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.