नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने...
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
विदर्भात यंदा सांस्कृतिक दिवाळीच साजरी होते आहे. यवतमाळला अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले अन्‌ आता नागपुरात, गेल्या दोन-तीन वर्षांपासून हुलकावण्या देणारे नाट्यसंमेलन याच महिन्यात होते आहे. संमेलन म्हटले की वाद होतातच. मात्र, नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने त्याचे प्रमाण कमी असते. यंदा तर आतापर्यंत वादाचे गालबोट लागलेले नाही. पुढेही लागणार नाही, हे नक्की! गेल्या वर्षीच्या मुलुंड येथील नाट्यसंमेलनात संमेलनाचा बाज थोडा बदलला गेला. अगदी सुदूर विदर्भातल्या लोककलांचेही सादरीकरण झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली. हे संमेलन विदर्भात होते आहे. त्यामुळे रंगभूमीच्या बाबत नागपूर-मुंबई हे अंतर कमी होण्यास याची मदत होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
 
 
 
 
नाट्यसंमेलन म्हणजे जरा वलयांकितच असतं, त्यामुळे त्याला चर्चेत येण्यासाठी वाद आणि वादळांची गरज नसते. हे 99वे नाट्यसंमेलन आहे. पुढचे शतकी असेल. त्याची ही रंगीत तालीमच आहे. नाट्यसंमेलनात चित्रपट, मालिकांतील तारे- तारका आपसूकच सहभागी होतात. त्यामुळे त्याची चमक तशीच वाढत असते. प्रखर प्रकाशात डोळे दिपून जाण्याची शक्यता दाट असते. येणारे बहुतांश रसिकही नाटक बघायला िंकवा त्यावर विचार करायला आलेले नसतात. येणार्‍या तारे- तारकांच्या प्रखर प्रभावळीत डोळे आणि प्रसंगी दृष्टीही दिपून गेल्याने संमेलनात नाट्यविचार हरपून जाऊ नये, याचे भान सार्‍यांनीच राखले पाहिजे. त्यात विदर्भात- नागपुरात असली आयोजने नियमित होत नाहीत. तिकडे पुण्या-मुंबईकडे चर्चासत्रांपासून अभिवाचनापर्यंत सतत काहीना काही प्रयोग सुरू असतात. नाट्यसंहितांचे अधिकोषही त्यांनी निर्माण केले आहेत. पुण्यात आंतरराष्ट्रीय नाटकांचा ‘आयपार’ हा महोत्सव होत असतो. त्यामुळे जागतिक रंगभूमीवर काय सुरू आहे, याचेही भान आपसूकच येते. हे सारेच जगण्याची शैली आणि समाजासमोर असलेल्या समस्यांवर अवलंबून असते, हेही खरेच; पण विदर्भात या सांस्कृतिक जाणिवांची कमतरता आहे, हेही तितकेच खरे! नाटक कसे पाहावे, याचेही धडे देण्याची खरी गरज आहे. नाटक सुरू होण्याच्या आधी गडीगुपचूप होऊन आपल्या जागेवर रसिक प्रेक्षकाच्या भूमिकेत बसलं पाहिजे, हेही सांगावं लागतं. मध्येच यायचं अन्‌ आम्ही इतकं महागडं तिकीट काढलं म्हणून जागा क्रमांक शोधत सभेचा विक्षेप करायचा, असे सतत होते. मागे विक्रम गोखले हे ‘बॅरिस्टर’ घेऊन आले होते. अत्यंत करुण वळणावर ‘दत्त दत्त, दत्ताची गाय...’ सुरू झालं आणि प्रेक्षकांनी वसंतराव देशपांडे सभागृहात टाळ्यांचा ताल देत तो प्रसंग ‘एन्जॉय’ करणे सुरू केल्यावर गोखलेंनी नाटक थांबविले. स्पृहा जोशींच्या ‘डोण्ट वरी बी हॅपी’ या नाटकातही अत्यंत गंभीर प्रसंग सुरू असताना एका महानुभावाचा मोबाईल वाजू लागला अन्‌ ते महाशय जागेवर बसूनच मस्तपैकी बोलूही लागले... असा प्रसंग सादर करण्यासाठी कुठल्या अवस्थेत जावं लागतं कलावंताला, ते नाटकाच्या प्रेक्षकाला कळायला हवं. स्पृहा जोशींनी नाटक थांबविलं...
 
 
 
 
 
तर सांगायचं हे की, नाटक बघणारा प्रेक्षकही घडविण्याची गरज आहे. इकडे व्यावसायिक नाटकांचेही प्रयोग होत नाहीत. कशाला, अगदी खूप गाजलेले मराठी चित्रपटच काय ते विदर्भात काही शहरांतच प्रदर्शित होतात. समजा वर्षाला 100 मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतील, तर त्यातील अगदी पाच-सातही विदर्भातील चित्रपटगृहात दाखल होत नाहीत. त्या पृष्ठभूमीवर हे नाट्यसंमेलन ही पर्वणी आहे. ते यशस्वी करण्याची जबाबदारी नागपूरकर रसिकांचीही आहेच. व्यावसायिक रंगभूमी इकडे स्थिरावलेली नाही. त्याचे कारण इकडे चांगले नट नाहीत, लेखक नाहीत, असे नाही. व्यवस्थेचा अभाव आहे. मुंबई-पुण्याच्या नाटकांचे दौरे इकडे होत नाहीत अन्‌ इकडे राज्य अन्‌ कामगार नाट्यस्पर्धा सोडल्या तर नाटके उभी राहात नाहीत. स्पर्धेत किमान चर्चेत असणार्‍या नाटकांचेही प्रयोग विदर्भात सर्वदूर झाले तर प्रेक्षकांना ते हवे आहेत. असे होत नाही. अगदी पहिल्या क्रमांकात आलेले नाटकही प्रयोगांना पारखेच राहते. याचे कारण अनास्था हे आहेच, पण व्यवस्थेचा अभाव हेही आहे. आता तिकडच्या एखाद्या नाटकाचा दौरा लागला की, नागपुरात एक प्रयोग करून जाणे त्यांना परवडत नाही अन्‌ मग एकाच प्रयोगासाठी नाटक येते तेव्हा त्याचा खर्च आयोजकांना परवडत नाही. त्यामुळे नागपुरात दोन-तीन प्रयोग आणि फारच फार चंद्रपूर, अमरावतीला प्रयोग इतकाच काय तो परीघ. अगदी जिल्हा ठिकाणीही थिएटर्स नाहीत. ती व्हावीत अशी राजकीय इच्छाशक्तीही नाही. या संमेलनात या सार्‍याच विषयांवर िंचतन व्हावे. व्यावसायिक रंगभूमी इकडे विकसित होऊच शकत नाही, असे आता स्वीकारले गेले आहे. झाडीपट्‌टी रंगभूमी व्यावसायिकतेच्या पातळीवर टिकूनच आहे की. पुण्या-मुंबईचे कलावंत, लेखक इकडे येऊन व्यवसाय करून जातात. नागपूरकर काही कलावंत झाडीपट्‌टी रंगभूमीच्या भरवशावरच जगतात. त्याला आपण ग्लॅमर देऊू शकलेलो नाही. वैदर्भी वृत्तपत्र, माध्यमांतही त्याच्या बातम्या होत नाहीत. तिथल्या कलावंतांना वलय देण्याचे काम कुणाचे?
 
 
 
प्रायोगिक रंगभूमीची अवस्था काय? ती समृद्ध आहे का? पुण्या- मुंबईच्या बाहेरच ती अस्तित्वात आहे. त्यातले एखादे या महानगरात दखलपात्र ठरते आणि मग त्याची चर्चा होते. अनेक प्रयोगांकडे दुर्लक्षच होते. मग कुणी प्रयोग करायला धजत नाही. राज्य नाट्यस्पर्धेतही प्रयोग करण्याची जोखीम कुणी घेत नाही. मध्यंतरी नव्याने लिहिलेल्या नाटकांचेच स्पर्धेत प्रयोग व्हावेत, असा नियम करण्यात आला होता. त्यातल्या प्रयोगांची किती दखल घेतली गेली? त्यातल्या चांगल्या नाटकांचे दौरे महाराष्ट्रात जिथे होऊ शकतात तिथे होण्याची व्यवस्था निर्माण करायला हवी. क्रमांकात आलेल्या नाटकाबाबत तसा नियम आहे; पण तो अंमलात येऊच नये असाच आहे. नंबरात आलेल्या नाटकाचे त्या संस्थेने महाराष्ट्रात 25 प्रयोग करावेत, त्याच्या खर्चाचा हिशेब दाखवावा आणि मग बाबूगिरीला कळेल, झेपेल, पचेल अशा पद्धतीने हिशेबाची कारकुनी केल्यावर सहा महिन्यांनी पैसे मिळतील... तोवर हौशी नाट्य संस्थांनी काय करायचे? त्यामुळे नंबरात आलेल्या नाटकांचेही प्रयोग होत नाहीत. राज्य नाट्यस्पर्धेत पहिल्या तीनमध्ये येणार्‍या नाटकांचे पालकत्व एखाद्या व्यावसायिक नाट्य निर्मात्या संस्थेकडे देत त्यांना शासन अनुदान नाही का देऊ शकत?
 
 
 
आता नाट्य निर्मात्यांचेही काही प्रश्न आहेतच. त्यांना मुंबई- पुण्याच्या बाहेर त्यांच्या नाटकांचे दौरे करायचेच नसतात असे नाही. मात्र, जी अवस्था विदर्भाची आहे तीच उर्वरित महाराष्ट्राचीही आहे. महाराष्ट्रातील नाट्यगृहांची अवस्था दारुण म्हणावी अशीच आहे. नावालाच काही थिएटर्स आहेत. तिथे व्यवस्थेच्या नावाने बोंबच आहे. नाटकेच होत नाहीत म्हणून प्रेक्षकही तयार झालेले नाहीत. प्रत्येकच नट म्हणतो, माझी प्राथमिकता रंगभूमीला, माझे पहिले प्रेम रंगभूमी हेच... मात्र, आता दूरचित्रवाणीच्या मालिकांच्या वरवंट्यात नाटक टिकून आहे का? त्यात आता बड्या मनोरंजन वाहिन्याही नाटकांची निर्मिती करू लागल्या आहेत. हमखास विकले जाईल तेच आणि अत्यंत बडेजावाने सादर केले जाते. यात प्रायोगिकतेचा गळा घोटला जातो. कितीदा नटसम्राट, हा प्रश्न निर्माण होतो. नवतेचा शोध घेतला गेला नाही, तर नाटकांचा प्रवाह आटून जायचा ना! टी ट्वेंटी आणि एक दिवसीय स्वरूपामुळे कसोटी क्रिकेटची जशी िंचता आहे तसेच मालिकांच्या झपाट्यात नाटकांचे काय होणार, हा विषय आहेच. एकांकिका स्पर्धा म्हणजे व्यावसायिक रंगभूमीचे प्रवेशद्वार आहे का िंकवा मालिका, चित्रपटांची सरावभूमी, हाही प्रश्न आहे. विदर्भात तर एकांकिका स्पर्धा होतात का आणि जुन्या किती टिकून आहेत, याचा शोध घेतला जायला हवा. या सार्‍याच प्रश्नांना या नाट्यसंमेलनाने हात घालावा. कारण नागपूर ही प्रयोगांची अन्‌ परिवर्तनाची भूमी आहे. संमेलनाध्यक्ष गज्वींनी प्रायोगिक निष्ठा कायम ठेवल्या आहेत म्हणून या संमेलनाकडून अपेक्षाही खूप आहेत...