मोठा भाऊ तर जनताच ठरवणार ना?
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
भारतीय जनता पार्टीसोबत युती केली नाही तर लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या चारपाचही जागा निवडून येणार नाहीत, अशी परिस्थिती असताना आणि त्याची जाणीव असतानाही शिवसेनेचे काही वाचाळ नेते, विशेषत: जे कधी जनतेतून निवडून आले नाहीत, ज्यांनी मागच्या दाराने लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश केला आहे, असे नेते वारंवार भाजपावर टीका करत दर्पोक्ती करीत आहेत. निवडणूक कशी िंजकायची असते, हे अशा नेत्यांनी आधी निवडणुकीच्या मैदानात उतरून शिकले पाहिजे आणि स्वत:ला िंजकवून मगच डरकाळ्या फोडल्या पाहिजेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडणूक रणनीतीचा संदर्भ देत, शिवसेनेचे वाचाळवीर स्वत:ला राज्यात मोठा भाऊ म्हणवून घेत आहेत. पण, बाळासाहेबांची शिवसेना याच वाचाळवीरांनी त्यांच्या निष्क्रियतेने संपविली आहे, हे मान्य करायला ते तयारच नाहीत. बाळासाहेब ठाकरे हे िंहदुहृदयसम्राट होते, ते शिवसैनिकांनाच नव्हे, तर भाजपातल्याही सगळ्यांनाच आवडायचे. त्यांची बोलण्याची शैली, त्यांची आक्रमकता, त्यांची कडक भूमिका अशा सगळ्याच बाबी राज्यातल्या तमाम हिंदुत्ववादी लोकांना आवडायच्या. आजही शिवसेनाप्रमुखांच्या जीवनचरित्रावर तयार झालेला ‘ठाकरे’ हा सिनेमा केवळ शिवसैनिकांनीच पाहिला असे नाही, तर बाळासाहेबांवर मनापासून प्रेम करणार्‍या भाजपातील मंडळींनी आणि विरोधी पक्षातील लोकांनीही पाहिला. यावरूनच बाळासाहेबांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.
बाळासाहेब हयात होते, तोपर्यंत शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीमध्ये खरोखरीच शिवसेनेकडे मोठ्या भावाची भूमिका होती. कारण, निवडणुकीत शिवसेनेचे जास्त आमदार निवडून येत असत. पण, बाळासाहेब काळाच्या पडद्याआड गेलेत आणि शिवसेनेला उतरती कळा लागली. ती का लागली, कशी लागली, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. बाळासाहेबांनंतरही शिवसेना आज टिकून आहे, निवडणुका लढते आहे, िंजकते आहे, हे जरी खरे असले, तरी शिवसेनेत पूर्वीसारखा जोश राहिलेला नाही. नारायण राणे आणि छगन भुजबळ यांच्यासारखे शिवसेनेतले वाघ अन्य पक्षांत गेले आणि तिथेही त्यांनी आपले स्थान निर्माण केले. राज ठाकरे यांनीही शिवसेना सोडून स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. त्यामुळे शिवसेनेला लागलेली गळती कधी थांबलीच नाही. ही गळती थांबवून स्वत:ला सक्षम करण्यावर भर देण्याचे सोडून, शिवसेनेने सातत्याने भारतीय जनता पार्टीला ठोकून काढण्याचीच भूमिका घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली. पण, तरीही पंतप्रधान वा भाजपाच्या कुण्याही ज्येष्ठ नेत्याने कधीही शिवसेनेवर वा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली नाही. भाजपाचे वरिष्ठ नेते, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ‘पटक देंगे’ची भाषा जरूर बोलली होती, पण त्यातही जर-तर होते.
 
 
 
 
अपवाद वगळता भाजपाकडून कायम संयमच पाळण्यात आला. मात्र, शिवसेनेतल्या दिग्विजयिंसहांनी वाचाळपणा करीत, भाजपा वा मोदींपेक्षा शिवसेनेचेच नुकसान अधिक केले आहे. कधीकाळी शिवसेना मोठा भाऊ होती, आता लहान भाऊ झाली आहे. शिवसेनेला पुन्हा मोठा भाऊ होण्याची संधी आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी अर्ध्या म्हणजे 144 जागा लढवून शिवसेनेने मोठा भाऊ होऊन दाखविले तर त्यात मर्दुमकी आहे, असे म्हणता येईल. पण, युती करताना 288 पैकी 171 जागा स्वत:साठी मागायच्या आणि भाजपाला 117 जागा सोडण्याची तयारी ठेवायची, अशा प्रकारे निवडणूक लढवून स्वत:ला मोठा भाऊ सिद्ध करायचे, यात कसली आली मर्दुमकी? शिवसेनेत िंहमत असेल तर 117 जागा स्वत: लढवाव्या, भाजपाला 171 जागा द्याव्या आणि भाजपापेक्षा जास्त जागा िंजकून दाखवाव्या. असे झाले तर भाजपाचे लोकही शिवसेनेला मोठा भाऊ या नात्याने ‘दादा’ म्हणून हाक मारतील. दुसरे म्हणजे शिवसेनेला सरकारवर टीका करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राहिलेला नाही.
 
 
 
 
राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी आहे. या दोन्ही सरकारांमधून बाहेर पडून सेनेने सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरावे आणि स्वत:ची क्षमता सिद्ध करून दाखवावी. सरकारमध्ये राहून सरकारला चोर म्हणायचे, शेतकरीविरोधी म्हणायचे, नालायक म्हणायचे, हा उद्योग शिवसेनेने बंद करायला पाहिजे. असे बोलून शिवसेना स्वत:लाच शिव्या घालते आहे, हे त्यांच्याही लक्षात येत नसावे असे नाही. पण, ते या भ्रमात आहेत की, या राज्यातील जनता दूधखुळी आहे. आपण काहीही बोललो तरी जनतेला कळत नाही आणि आपली पोळी शेकली जाईल. शिवसेनेतील दिग्विजयिंसहांनी आता या भ्रमातून बाहेर पडले पाहिजे. जनता हुशार झाली आहे, हे 2014 सालच्या निवडणुकीत दिसून आले आहे. शिवसेनेने आता निवडणुकीच्या व्यवस्थापनात तरबेज असलेल्या प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचे ठरविले आहे. जरूर मदत घ्यावी. पण, याच प्रशांत किशोर यांच्या भरवशावर निवडणूक लढणार्‍या कॉंग्रेस पक्षाला अपयश आले होते, याची आठवण सेनेने जरूर ठेवावी. निवडणुकीची रणनीती प्रशांत किशोर जरूर ठरवून देतील. पण, त्या रणनीतीनुसार काम करण्याची कुवत असलेले नेते आपल्याकडे आहेत का, याची चाचपणी शिवसेना पक्षप्रमुखांनी आताच घेतली पाहिजे. भाजपाशी युती न करता लोकसभेची निवडणूक लढल्यास शिवसेनेचे दोनतृतीयांश विद्यमान खासदार निवडून येणार नाहीत, अशी चर्चा असताना देशाचा पुढचा पंतप्रधान शिवसेनाच ठरविणार, अशी दर्पोक्ती जर कुणी करणार असेल, तर त्याची कीवही करावीशी वाटणार नाही. एकीकडे म्हणायचे की, राज्यात आम्हीच मोठ्या भावाची भूमिका बजावत आहोत आणि पुढेही बजावत राहू आणि त्याच वेळी आम्ही स्वबळावर लढू, असेही म्हणायचे, हे संपूर्णपणे अतार्किक आहे. ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना,’ अशी शिवसेनेची स्थिती झाली आहे. ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं,’ असं भाजपाच्या बाबतीत शिवसेनेचं झालं आहे. पण, ते मान्य करायला जो मोठेपणा लागतो, तो सेनेकडे नाही. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने खरेतर भाजपाशी असलेली युती तोडली होती. निवडणुकीच्या निकालांनंतर भाजपाने सरकार स्थापन केले आणि राष्ट्रवादीच्या पािंठब्याने विधानसभेत बहुमतही सिद्ध केले. शिवसेनेने एकनाथ िंशदे यांना विरोधी पक्षनेतेपदही दिले होते. एवढीच धमक होती तर शिवसेनेने विरोधी बाकांवर बसायला हवं होतं. पण, सत्तासुंदरी सेनेला खुणावत होती, सेनेचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी उतावीळ झाले होते आणि अखेर मोठ्या भावाच्या भूमिकेतून लहान भावाच्या भूमिकेत आलेल्या शिवसेनेने भाजपाने दिली ती खाती स्वीकारली. आजही सेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊनच सरकारमध्ये सहभागी आहेत आणि मंत्रिमंडळाच्या बैठकांनाही हजेरी लावतात. आपल्या देशात लोकशाही आहे. स्वतंत्रपणे निर्णय करण्याचा अधिकार शिवसेनेलाही आहे. खुशाल सेनेने सरकारबाहेर पडत सरकारविरोधी भूमिका घ्यावी, स्वबळावर सगळ्या निवडणुका लढवाव्यात. कुणी मनाई केली आहे? आणखी एक गोष्ट. सरकार अण्णा हजारेंच्या जिवाशी खेळतंय्‌, हे सेनेतल्या दिग्विजयिंसहांचं वाक्यही त्या पक्षाला आत्मपरीक्षण करायला लावणारं आहे. कारण, सरकारात सेनाही सहभागी आहे.