महाराष्ट्रातील चार कलाकारांचा सन्मान - संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते वितरण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
नवी दिल्ली,
 
 
प्रख्यात नाट्यलेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना राष्ट्रपती रामनाथ कोिंवद यांच्या हस्ते आज बुधवारी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर डॉ. संध्या पुरेचा यांना फेलोशीप प्रदान करण्यात आली.
 
 


 
 
 
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात राष्ट्रपती कोिंवद यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 4 कलाकारांसह देशभरातील 42 कलाकारांना 2017 चे नाट्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यावेळी उपस्थित होते. सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्‍या कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. एक लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 1952 पासून संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
 
 
 
 
 
 
 
 
नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर यांना सन्मानित करण्यात आले. भडकमकर यांनी गेली दोन दशके नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात अभिनेता व दिग्दर्शक म्हणून उत्तम कार्य केले आहे. नाटक, चित्रपट, कथा व कादंबरीच्या माध्यमातून उत्तम आणि दर्जेदार लेखक म्हणून सहजपणे वावरणारे भडकमकर उत्तम कलावंतही आहेत. ‘चुडैल’ हा कथासंग्रह, ‘असा हा बालगंधर्व’ ही बालगंधर्वांचा जीवनपट उलगडणारी कादंबरी आणि आजच्या मालिकाविश्वाच्या पडद्यामागील वास्तवाचे दर्शन घडविणारी ‘एट एनी कॉस्ट’ ही कादंबरी वैशिष्ट्यपूर्ण ठरली.
नाट्य दिग्दर्शनातील योगदानासाठी सुनील शानबाग यांना सन्मानित करण्यात आले. सुनील शानबाग यांची नाट्य दिग्दर्शक म्हणून ख्याती आहे. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्यासोबत त्यांनी 1974 ते 1984 अशा सलग दहा वर्षे 25 कलाकृतींमध्ये कलाकार व सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली.
 
 
 
 
 
 
 
प्रसिद्ध तबलावादक पं. योगेश सामसी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. सामसी यांनी पं. एच. तारंथनराव यांच्याकडून वयाच्या चौथ्या वर्षांपासून तबला वादनाचे धडे घेतले. यानंतर त्यांना सलग दोन दशक प्रसिद्ध तबला वादक उस्ताद अल्लारखॉं खान यांचे मार्गदर्शन लाभले. प्रसिद्ध गायक व नृत्यकलाकारांना सामसी यांनी तबल्याची साथ केली, यात उस्ताद विलायत खॉं, पं. अजय चक्रवर्ती, पं. भीमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा आदी दिग्गजांचा समावेश आहे.
 
 
 
 
 
लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना लोककलेतील योगदानासाठी गौरविण्यात आले. लोककला अकादमी अंतर्गत शाहीर अमरशेख अध्यासनाचे प्रमुख असलेले डॉ. खांडगे 1978 पासून संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी इंडियन नॅशनल थिएटर, लोककला संशोधन केंद्राचे ज्येष्ठ नाटककार अशोक परांजपे आणि ज्येष्ठ संशोधक रा. िंच. ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाला सुरुवात केली. डॉ. खांडगे यांनी चीनमध्ये लोककला लोकसंगीत परिषदमध्ये चार वेळा प्रतिनिधित्व केले, तर सॅन होजे येथे विश्व मराठी साहित्य संमेलनातही त्यांनी व्याख्यान दिले. नॅशविलमध्ये अमेरिकन फोकलोअर सोसायटीमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
 
 
 
 
 
 
ललित कलेतील योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या डॉ. संध्या पुरेचा यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप बहाल करण्यात आली. प्रसिद्ध भरत नाट्यम्‌ नृत्यांगणा असलेल्या डॉ. पुरेचा मुंबईस्थित कला परिचय संस्थेच्या संचालिका तसेच सरफोजीराजे भोसले भरत नाट्यम्‌ प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या सचिव आहेत. त्यांना मिळालेल्या फेलोशीपचे स्वरूप 3 लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे आहे.