महाजनकोचा लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019

नागपूर, 
टॅक्सीचे बिल काढण्यासाठी एका कंत्राटदाराकडून ५ हजाराची लाच घेताना कोराडी येथील महाजनकोचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी बाळकृष्ण कालीदास कुळकर्णी यांना रंगेहात पकडले.
 
तक्रारदार हे कोराडी देवी मंदिर रोडवर राहतात आणि टॅक्सी कंत्राटदार म्हणून काम करतात. त्यांनी कोराडी येथील महाजनको कार्यालयातील सुरक्षा विभागात एक टॅक्सी तात्पुरत्या स्वरूपात किरायाने लावली होती. ऑक्टोबर २०१८ ते जानेवारी २०१९ या चार महिन्याचे बिल प्रलंबित होते. २ फेब्रुवारी रोजी कंत्राटदाराने इन्कॅवायरी कोट ८१०२८ ने आपल्या के. एम. पाटील फर्मच्या नावाने ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले. त्याचा रजिस्ट्रेशन क्रमांक १८०२८ असा आहे. प्रलंबित चार महिन्यांचे बिल काढण्यासाठी तक्रारदार वरिष्ठ सुरक्षा अधिकारी बाळकृष्ण कुळकर्णी यांना भेटले असता प्रत्येक बिलापोटी २ हजाराची मागणी करून ४ बिलांचे ८ हजार रुपये मागितले.
 
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार बुधवारी कोराडी येथील महाजनकोच्या कार्यालयाभोवती सापळा रचला. तक्रारदाराने कुळकर्णी यांची भेट घेतली असता त्यांच्यात तडजोड होऊन पाच हजार रुपये घेण्याचे ठरले. तक्रारदाराने ५ हजार रुपये देताच दबा धरून बसलेल्या पथकाने कुळकर्णी यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.