काँग्रेसच्या नवनियुक्त नगरसेवकावर गुन्हा दाखल
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
-जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करणे भोवले
 
नागपूर, 
जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवित विजयी झालेल्या महादुला नगर पंचायतच्या एका नवनियुक्त नगरसेवकाविरुद्ध कोराडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मौसिन हुसेन शेख (३२) रा. नूरनगर, महादुला असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नवनियुक्त नगरसेवकाचे नाव आहे.
 
मौसिन शेखने वार्ड क्र. ७ मधून काँग्रेसचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. २७ जानेवारीला मतदान होऊन २८ जानेवारीला निकाल जाहीर करण्यात आला. त्यात मौसिन शेख हा विजयी झाला होता. दरम्यान, निवडणूक अर्ज भरताना मौसिनने मागास प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यासाठी त्याने पजारा जातीचे बनावट प्रमाणपत्र निवडणूक अधिकाèयांकडे सादर केले होते. याप्रकरणी मौसिन शेखने बनावट जातीच्या प्रमाणपत्रावर निवडणूक लढविली अशी तक्रार नगर पंचायत कार्यालयात करण्यात आली. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी संदीप दिलीप चित्रवार (३४) यांनी मौसिन याच्या जात प्रमाणपत्राची जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात तपासणी केली. त्यावेळी मौसिनने सादर केलेले जातीचे प्रमाणपत्र जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातून देण्यात आले नाही असे चित्रवार यास सांगण्यात आले. तसा लेखी अभिप्राय सहायक अधिकाèयांनी मुख्याधिकारी चित्रवार यांना दिला.
 
बोगस जातीच्या प्रमाणपत्रावर मौसिनने निवडणूक लढविल्याचे निष्पन्न होताच चित्रवार यांनी मंगळवारी कोराडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी ४२०, ४६६, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.