रायगड जिल्ह्यात मेहुल चोक्सीची 50 कोटींची संपत्ती - जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी सुरू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
नवी दिल्ली,
पंजाब नॅशनल बँकेच्या जवळपास 14 हजार कोटींच्या घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याची महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात 26 एकर जमिनीचा तपशील उघड झाला आहे. या जमिनीची िंकमत सुमारे 50 कोटींच्या आसपास असल्याचे कळते. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचा अहवाल मागवला असल्याचे वृत्त आहे.
 
 

 
 
एका मराठी वृत्तपत्रानुसार, गीतांजली जेम्सचा मालक असलेल्या मेहुल चोक्सीच्या गैरव्यवहारातील रक्कम वसूल करण्यासाठी सध्या त्याची देशभरातील कार्यालये, मालमत्तांवर छापे टाकण्यात येत आहे. काही मालमत्ता सील करण्यात आल्या असून, मूल्यांकन करण्याची कारवाई सुरू आहे.
 
 
चौकशीदरम्यान पनवेल तालुक्यातील एकूण 25 सात-बाराच्या उतार्‍यावर मेहुल चिनूभाई चोक्सीचे नाव असल्याचे दिसून आले आहे. चिरवत गावात 20 एकर आणि तुरमाळे, सांगुर्ली गावात त्याची उरलेली जमीन आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या चिरवत गावातील जमिनीला कुंपण घालून आत फार्महाऊस बांधण्यात आले आहे. या जमिनीवर पीएनबी बँकेने जप्तीची नोटीस बजावली आहे. सांगुर्ली व तुरमाळे गावांत प्रत्येकी तीन एकरांपेक्षा जास्त जमीन चोक्सीच्या नावावर असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. त्याच्या हिरे कंपनीच्या नावेही शेकडो एकर जमिनी खरेदी केल्याचे समजल्याने महसूल विभागाने आणखी खोल चौकशीला सुरुवात केली आहे.
 
 
दरम्यान, पनवेल तालुक्यातील नैना कार्यक्षेत्रात मेहुल चोक्सीच्या नावावरील 26 एकर जमिनींचा तपशील उघड झाला आहे. सध्या याठिकाणी किमान पाच लाख रुपये गुंठा दराने जमिनीला भाव मिळत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. यावरून चोक्सीच्या नावावरील जमिनीची अंदाजे िंकमत 50 कोटींपेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते.