स्कुलबसमध्ये गियरऐवजी बांबूचे वापर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
मुंबई
 
 
सांताक्रूझमधील पोदार शाळेच्या बसमध्ये गियरऐवजी बांबूचा वापर करण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले . एका अपघातानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या प्रकरणी खार पोलिसांनी स्कूलबसच्या चालकाला ताब्यात घेतले. मात्र त्याची जामीनावर सुटका झाली.
खारमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या कारला पोदार शाळेच्या बसने धडक दिली होती .  व्यावसायिकाने बसचा पाठलाग केला. यानंतर त्याला बसच्या गियरऐवजी बांबू वापरला जात असल्याचे दिसून आले . पुरावा म्हणून त्याने या प्रकारचे चित्रीकरण केले. त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर खार पोलिसांनी बस चालक राज कुमारला (21 वर्षे) ताब्यात घेतले. गियर बॉक्समध्ये तीन दिवसांपूर्वी बिघाड झाला. मात्र दुरुस्तीसाठी वेळ मिळत नसल्याने बांबूचा वापर केल्याचे राज कुमारने  पोलिसांना सांगितले . यानंतर त्याच्यावर कलम 279 (बेदरकारपणे वाहन चालवणे) आणि कलम 336 (जीव धोक्यात घालणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
बसचालक राज कुमारचा परवाना उत्तर प्रदेशातील असल्याचे  तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती पोदार शाळा प्रशासनाला कळवली आहे.