सेवा ही परमो धर्म...
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
सुजित हुम्नाबादकर यांच्या डोक्यात आपण समाजासाठी काहीतरी करावे, हा किडा वळवळत होता. पल्लवी व सुजित हुम्नाबादकर यांना समाजसेवेची जबरदस्त आवड असल्याने त्यांनी ‘समाधान सेंटर’ उघडण्याचा निर्णय घेतला.
घरातील व्यक्तींना दीर्घकालीन आजारात त्यांची शुश्रुषा करण्याकरिता दवाखान्याकडेच धाव घेतली पाहिजे, असे काहीही नाही. अशा सोयी आपण घरी देखील करू शकतो. त्याकरिता पल्लवी हुम्नाबादकर यांनी आपल्या राहत्या घरीच ही सोय ज्येष्ठांकरिता समाधान सेंटर उघडून केली.
 
सध्याच्या डिजिटल युगात घरात ज्येष्ठांंकडे फारसे लक्ष दिल्या जात नाही. त्यांच्या प्रत्येक गोष्टींच्या वेळा देखील पाळू शकत नाही. शिवाय घरात नोकरी करणारी माणसं असेल, अशा वेळी फारच पंचाईत होत असते. त्यांच्या सेवेत सतत एक माणूस ठेवावा लागतो आणि दवाखान्यात ठेवायचे म्हणजे तेवढा पुरेसा पैसा आपल्याकडे नसतो, अशा वेळी ज्यांना कुणाचा आधार नाही अशा व्यक्तींकरिता सुजित हुम्नाबादकर यांना आपण समाजासाठी काहीतरी करावे, असा विचार आला. पल्लवी व सुजित हुम्नाबादकर यांना समाजसेवेची जबरदस्त आवड असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. सुजित हे सॉफ्टवेअर इंजिनीयर आहेत. त्यांनी सहा वर्षे नोकरी केली. रामाश्रयमध्ये 2 वर्षे नोकरी केली. तेथून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी स्वत:चे डीस टीव्हीचे सेंटर उघडले होते. पण त्यांचा मूळ िंपडच समाजसेवेचा असल्याने त्यांना तो स्वस्थ बसू देत नव्हता. शेवटी त्यांनी ते डीस सेंटर देखील पूर्णपणे बंद केले आणि दोघांनी आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून समाधान या नावाने केयर सेंटर उघडले.

 
 
येथे सध्या 4 व्यक्ती वास्तव्यास आहेत. कुप्पुस्वामी आजोबा 91 वर्षांचे आहेत. त्यांना बोलता येत नाही. परंतु हिन्दी, इंग्लिश व तामील भाषा येते. त्यांना जे पाहिजे ते वहीत लिहून यानुसार त्यांचा संवाद चालतो. 78 वर्षांच्या आजी आहेत मंगला वेखंडे. त्या उत्तम प्रवचनकार आहेत. त्यांना दोन मुली आहेत. एक मुलगी नागपुरात जयप्रकाशनगर येथे आहे. परंतु आईकडे लक्ष देणे होणार नाही, म्हणून तिने त्यांना समाधानला आणले. त्या आता फारच येथील वातावरणात रमल्या आहेत. विजया ढेंगे 75 वर्षांच्या आहेत. आनंद सोनी हे 52 वर्षांचे आहेत. त्यांचा वाढदिवस परवाच या सेंटरमध्ये साजरा झाला. घरी होणार नाही इतके लाड या सेंटरमध्ये केले जातात. या सगळ्यांची देखभाल करण्याकरिता चार प्रशिक्षित बायका आहेत. एक कूक आहे. प्रत्येक व्यक्तींच्या गरजेनुसार आहार दिला जातो. अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींकरिता विश्रांतीची व सहायकाची व्यवस्था आहे. आवश्यकता असेल तेव्हा डॉक्टर देखील येथे येऊन ट्रिटमेंट करतात. दवाखान्यात जाण्यासारख्या व्यक्ती असतील तर त्यांना दवाखान्यात घेऊन जातात. तसेच योगा देखील या व्यक्तींकडून करवून घेतात.
 
आम्हाला कुठूनही अनुदान मिळत नाही. ज्या व्यक्ती या सेंटरवर आश्रयाकरिता येतात त्या सगळ्यांकडेच पुरेसे पैसे असतातच असे नाही, अशा वेळी आम्ही त्यांना इथे राहण्यास नाही म्हणत नाही. त्यांना इथे आश्रय देतो. येथे राहणार्‍या व्यक्तींना खरे समाधान लाभते हीच आमची सेवा होय. येथील बर्‍याच लोकांना पल्लवी या आपली मुलगी तर कुणाला सून म्हणून भासते, हेच आमच्यासाठी खरे धन होय असे पल्लवीताईंनी सांगितले.
-मीनाक्षी वैद्य