थॉमस एडिसन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
शालेय-शिक्षण हा मध्यमवर्गीय व्यक्तींच्या जीवनातला अविभाज्य असा घटक आहे. जो शिक्षीत नाही तो जीवनात काही साध्यच करूच शकणार नाही, असा अलिखित नियम आपण सगळे पाळत असतो िंकबहुना, असा एक गैरसमज पाळत असतो. शिक्षण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे याबाबत काही दुमत नाही. परंतु, शालेय शिक्षणच महत्त्वाचे आहे का? यात मात्र शंकाच आहे. आपल्या आदर्श मंडळींनी वेळोवेळी शिक्षणाचे महत्त्व उजागर केलेले आहे. त्यापैकीच एक म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा एक आहेत. त्यांनी तर आपल्याला एक मूलमंत्र सुद्धा दिलेला आहे. ‘वाचाल तर वाचाल.’ परंतु मला वाटते की आपल्यात एक खूप मोठा दोष आहे. तो म्हणजे कोणत्याही गोष्टीला वरवर समजुन घेणे. त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्नच आपण करत नाही. जसे की बाबासाहेबांनी आपल्याला शालेय शिक्षण घ्यायला सांगितले की वाचायला सांगितले? ते अत्यंत ज्ञानी व्यक्ती होते, त्यामुळे शब्दांचा अचूक उपयोग ते करायचे. त्यांना जर शालेय शिक्षणाबद्दल बोलायचे असते तर ‘शिकाल तर वाचाल’ असे म्हटले असते. अर्थात त्यांनी सुद्धा क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण हे विविध विषयांवर वाचायला सांगीतले ना की फक्त शालेय शिक्षण घ्यायला. त्यांचे म्हणणे कसे सार्थक आहे, हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघुया.
अमेरिकेतील मिलान या गावी 11 फेब्रु. 1847 रोजी सेमुएल आणि नैन्सी यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु त्याच्या जन्माने या दाम्पत्याला खूप वाईट वाटले, कारण ते मुल सर्वसामान्य नसून विशेष मूल (स्पेशल चाईल्ड) होते. त्याला लहानपणापासूनच कोणतीही गोष्ट शिकायला खूप वेळ लागायचा. त्याला विचित्र विवित्र प्रश्न पडायचे. ज्यामुळे सर्वजण त्रासुनजायचे. ते मुल स्वत: चाचपणी केल्याशिवाय कुठलीच गोष्ट स्विकारायला तयार होत नव्हते. येवढे कमी की काय म्हणून लहानपणीच ताप आल्यामुळे त्याची ऐकू येण्याची क्षमता सुद्धा कमी झाली होती. त्याच्या या सर्व समस्यांमुळे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले, ज्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण जवळ-जवळ संपूष्टात आले. परंतु, त्यांच्या आईंनी या पराभवावर मात करायचे ठरविले आणि त्याला घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली. एकीकडे मुलाची शिक्षणाची समस्या तर दुसरीकडे कुटुंबावर आर्थिक संकट अशी त्यांच्या आईची परिस्थिती झालेले होती. परंतु अतिशय धैर्याने त्यांनी या संकटाचा सामना केला.
 
एकदा त्यांच्या मुलाने स्टेशन मास्टरच्या मुलाचा जीव स्वत:च्या जीवावर खेळून वाचविला. उपकाराची परतफेड म्हणून द्यायला काहीच नसल्याने स्टेशन मास्तरने त्यांना टेलिग्राम शिकविण्याचे वचन दिले. टेलिग्राम शिकून 1868 मध्ये त्या मुलाने एक ‘वोट रेकॉर्ड’ मशीन बनविली आणि त्याचे पेटंट मिळविले. त्यानंतर ती मशिन त्यांनी ‘स्टॉक एक्सचेंज’च्या मालकाला भेट दिली. त्या बदल्यात त्यांना त्या काळात 40,000 डॉलर ऐवढी रक्कम मिळाली.

 
 
या रकमेच्या भरवशावर त्याने एक प्रयोगशाळा सुरू केली, आणि एका मागे एक असे नवनवीन संंशोधन करायला सुरुवात केली. 1877 मध्ये ग्रामोफोन आणि 1889 मध्ये बल्बचा शोध त्या एकेकाळी शिकण्याची समस्या असलेल्या मुलाने लावला. एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल की- तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून थॉमस एल्वा एडिसन हे होते. त्यांनीच पुढे टेलिफोन रिकॉर्ड, सीडी, चलचित्र कॅमेरा, इत्यादी असे 1093 पेटेंट स्वत:च्या नावावर नोंदविले. याशिवाय यु.के. फ्रांन्स आणि जर्मनी मधील सुद्धा अनेक पेटेंटस्‌ त्यांच्या नावावर आहेत. त्यांची ख्याती आणि कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांना प्रथम विश्वयुध्दात ‘जलसेना मार्गदर्शन बोर्डाचे’ अध्यक्षपद मिळाले. तिथे सुद्धा त्यांनी 40 युद्धोपयोगी अविष्कार केले.
थॉमस एडिसन हे फक्त एक उत्कृष्ट शास्त्रज्ञच नाही तर एक उत्तम उद्योजक सुद्धा होते. त्यांनी 14 कंपनींची स्थापना केली त्यापैकीच एक म्हणजे जगप्रसिध्दा ‘जनरल इलेक्ट्रीकल्स’ अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा मृत्यू 18 ऑक्टो. 1931 रोजी झाला.
 
तेव्हा मित्रांनो हे उदाहरण सांगण्याचे तात्पर्य ऐवढेच की शालेय शिक्षणापर्यंतच आपण मर्यादित न राहता. सवार्ंगिण शिक्षण घेण्याकडे आपला कल असायला पाहिजे. तेव्हा आजपासून तुम्ही सुद्धा क्षणाक्षणाला शिकायला सुरुवात करा.
-घनश्याम आवारी