भारत दौर्‍यासाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
मेलबर्न,
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याला आगामी भारत दौर्‍यावर मुकावे लागणार आहे. भारत दौर्‍यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया संघातून अष्टपैलू मिशेल मार्श आणि पीटर सिडल यांना वगळण्यात आले आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या या दौर्‍यात ऑस्ट्रेलिया संघ यजमान भारतासोबत दोन टी-२० आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
 
गेल्या महिन्यात भारताविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार्‍या ऑस्ट्रेलिया संघातील १६ पैकी ११ सदस्यांना भारत दौर्‍यासाठी कायम ठेवण्यात आले आहे. या दौर्‍यात भारताने ऑस्ट्रेलियाला वनडे आणि कसोटी मालिकेत पराभूत केले होते, तर टी-२० सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली होती.
 
 
 
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळताना स्टार्कला दुखापत झाली होती. त्यांच्या खांदे आणि छातीमध्ये वेदना होत आहेत. स्टार्कची दुखापत गंभीर आहे. त्यामुळे त्याला भारत दौर्‍यावर संधी न देता विश्रांती देण्यात आली आहे. तो मार्च महिन्यात संयुक्त अरब अमिरात येथे पाकिस्तानविरुद्ध होणार्‍या मालिकेत खेळण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवड समितीचे ट्रॅव्हर होन्स यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
 
हेझलवुडलाही कंबरदुखीचा त्रास होत असल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. भारतविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेद्वारे संघात पुनरागमन करणार्‍या पीटर सिडलचे भारत दौर्‍यासाठी मात्र तिकीट काढण्यात आलेले नाही. दरम्यान, ॲरोन फिंचकडे ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 
टी-२० मालिकेतील पहिला सामना २४ फेब्रुवारीला विशाखापट्टनम्‌ येथे, तर दुसरा सामना २७ फेब्रुवारीला बंगळुरू येथे होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सामने हैदराबाद (२ मार्च), नागपूर (५ मार्च), रांची (८ मार्च), मोहाली (१० मार्च) आणि दिल्ली (१३ मार्च) येथे खेळले जाणार आहेत.