प्रियांकांच्या प्रवेशामुळे सपा-बसपाचेच नुकसान
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
 - पूर्वांचलमधील भाजपाच्या जागांवर परिणाम नाही
  
लखनौ,
 
लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर कॉंगे्रसने हुकमी एक्का म्हणून पियांका वढेरा यांना राजकारणात सक्रिय केले असले, तरी त्याचा कुठलाही प्रभाव पूर्वांचलमध्ये भाजपाच्या जागांवर होणार नाही. कॉंगे्रसला प्रियांकामुळे फक्त दोन जागांचा फायदा होणार असून, सर्वाधिक नुकसान सपा आणि बसपा आघाडीला होणार आहे, असे एका ताज्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
 
 

 
 
 
 
प्रियांका यांच्या राजकीय प्रवेशामुळे उत्तरप्रदेशच्या पूर्वांचल भागात कॉंग्रेसची मतांची टक्केवारी वाढू शकते, पण त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता कमी आहे, असे इंडिया टीव्ही-सीएनएक्सने पूर्वांचलमधील 43 जागांवर सर्वेक्षणात दिसून आले आहे. पूर्वांचलमधील सर्वच जागांवर कॉंगेसच्या मतांच्या टक्केवारीत वाढ होईल, पण त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता कमी आहे. या प्रदेशात कॉंग्रेसला 4, रालोआला 20 आणि सपा-बसपा आघाडीला 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. प्रियांकामुळे उत्तरप्रदेशमधील चित्र किती बदलले आहे आणि कॉंग्रेसला किती जागांचा फायदा होईल, हे जागानिहाय सर्वेक्षणात जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. यात कॉंगे्रसला अपेक्षित यश मिळणार नाही, तिथेच भाजपाचे कुठलेही नुकसानही होणार नसल्याचे दिसत आहे. प्रियांकामुळे काही जागांवर भाजपाच्या मतात घट होताना दिसत असले, तरी आधीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत भाजपाच्या जागांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
 
 
 
 
प्रियांकामुळे कॉंग्रेसच्या 2 जागांमध्ये वाढ होईल. पूर्वांचलमध्ये अमेठी आणि रायबरेलीसह 4 जागांवर कॉंगे्रसला विजय मिळू शकतो. सपा-बसपा आघाडीचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. जुन्या सर्वेक्षणात आघाडीला 26 जागा देण्यात आल्या होत्या, आता त्यांना 7 जागांचे नुकसान सोसावे लागणार आहे. आघाडीला 19 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. भाजपाला 5 जागांचा फायदा दिसत आहे. प्रियांका यांच्या राजकीय प्रवेशाआधी सर्वेक्षणात भाजपाला 15 जागा तर कॉंग्रेसला अमेठी आणि रायबरेली या दोनच जागा िंजकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.