भारत-न्यूझीलंड दुसरा टी-२० सामना उद्या
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
 
सामन्याची वेळ : सकाळी 11.30 वाजता
सामन्याचे ठिकाण : इडन पार्क, ऑकलंड   
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३ वर  
 
ऑकलंड, 
पहिल्या सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करणार आहे.  न्यूझीलंड संघाने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताची विजयी घोडदौड रोखली होती. या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे.
 
 
 
पहिल्या सामन्यात भारताला कोणत्याच क्षेत्रात चांगली कामगिरी करता आली नव्हती. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात भारताचा ८० धावांनी पराभव केला होता. भारतीय संघातील युवा खेळाडूंवर यशाची दारोमदार राहणार आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळविण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या दौर्‍याचा हे युवा क्रिकेटपटू कितपत फायदा करून घेतात, हे बघावे लागणार आहे.
 
दुसरीकडे, पहिल्या सामन्यातील विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या न्यूझीलंड संघ दुसर्‍या सामन्यात आपले प्रदर्शन आणखी चांगले करण्यावर भर देईल. आम्ही पहिल्या सामन्यातील लय दुसर्‍याही सामन्यात कायम ठेवू, असे न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सन याने सांगितले.