विरोधकांची टीका म्हणजे 'उल्टा चोर चौकीदार को डाँटे' : नरेंद्र मोदी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
 

 
 
नवी दिल्ली,
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत निवडणुकांपूर्वीचे शेवटचे भाषण केले. मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीतील हे अखेरचे अधिवेशन होते. या अधिवेशनानंतर लोकसभा निवडणुकींचा बिगुल आहे. १६ व्या लोकसभेतील आपल्या शेवटच्या भाषणात मोदींनी विरोधकांना लक्ष करत, गेल्या साडेचार वर्षात सरकारने देशात केलेल्या प्रगतीचा पाढा वाचला. विरोधकांना टार्गेट करताना ते म्हणाले, मोदींना वाईट म्हणा, भाजपाला वाईट म्हणा, पण हे करताना देशाला वाईट म्हणू नका. सध्याची विरोधकांची टीका म्हणजे 'उल्टा चोर चौकीदार को डाँटे', अशीच असल्याचे मोदींनी म्हटले.
 
आम्ही लोकांमध्ये जाऊन केलेल्या कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडणार आहोत. देशातील कोट्यवधी तरुणांचा मी आभारी आहे, जे यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करणार आहेत. देशातील संसदीय लोकशाही प्रणालीची ते घटक बनत आहेत. त्यासोबतच, आगामी निवडणुकांसाठी मी सर्वांनाच शुभेच्छा देतो, असे मोदी म्हणाले.
 
 
 
 
 
जे आव्हानांना घाबरतात, ते नवीन समस्या निर्माण करतात. आव्हानांना आव्हान देण्याचे काम आम्ही करत आहोत. बीसी म्हणजे बिफोर काँग्रेस आणि एडी म्हणजे आफ्टर डायनेस्टी, असाच प्रकार आहे. काँग्रेसपूर्वी आणि काँग्रेसनंतरच देश असेच विरोधकांचे  म्हणणे असल्याचे मोदींनी म्हटले. तर, देश गेल्या ५५ महिन्यात मोठ्या प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. भारताची अर्थव्यवस्था आज देशात ६ व्या क्रमांकावर आहे.
 
 
 
काही वर्षापूर्वी भारताची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. इंटरनेट डेटा सर्वात स्वस्त अन् वापर जगभरात सर्वाधिक प्रमाणात भारतात होत असल्याचचेही मोदींनी सांगितले. तसेच गेल्या साडेचार वर्षात १० कोटी शौचालये बांधण्यात आली असून, ५५ महिन्यात ५० टक्के बँक खाती, वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणात पोहोचविण्याच काम केल्याचेही मोदींनी सांगितले. महागठबंधन म्हणजे महामिलावट असल्याचा आरोपही मोदींनी केला.