सिंचन घडक कार्यक्रम अंतर्गत वर्धा जिल्हयाचा समावेश
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
- खासदार रामदास तडस यांची माहिती. 
- वर्धा जिल्हयाला २००० विहीरी मंजूर झाल्याचा शासन आदेश निर्गमीत
वर्धा,
नागपूर विभागातील भूगर्भात पाण्याची उपलब्धता असुनही विहीरींची संख्या कमी असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले होते. नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विहीरीच्या धडक सिंचनाच्या कार्यक्रमांतर्गत १०००० विहीरिंचा कार्यक्रम घेण्यात येईल व लोकप्रतिनीधींनी मागणी केल्यानुसार वर्धा जिल्हयाचा समावेश करुन लक्षांक देऊ असे जाहीर केले होते. त्यानुसार नागपूर विभागातील वर्धा जिल्हयात सिंचन विहीरीच्या धडक कार्यक्रम अंतर्गत सन २०१९-२० करीता २००० विहीरी मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून दिली.
 
 
 
याबाबतचा सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निर्गमीत करण्यातत आलेला आहे. या शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे सिंचन विहीरीचा धडक कार्यक्रम या योजनेत दिनांक ३० जून २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या योजनेतून दुष्काळी तालुक्यांना प्राधान्य देण्यात यावे असे नमुद करण्यात आले आहे.
 
शेतकरी बांधवांना लाभदायी असलेल्या या योजनेमध्ये वर्धा जिल्हयाचा नव्याने समावेश करुन २००० विहीरी मंजूर केल्याबद्दल खासदार रामदास तडस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री तथा वित्तमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार व या विषयामध्ये सहकार्य करणारे मा. मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यअधिकारी श्री. सुमीत वानखेडे यांच्याप्रती आभार व्यक्त केले.