२०१८ मध्ये सर्वात जास्त फाशीची शिक्षा; गेल्या २० वर्षात हा आकडा सर्वाधिक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
2018 या वर्षभरात भारतामध्ये 162 लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील राष्ट्रीय कायदा विद्यापीठाने एका अभ्यासाअंतर्गत याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशमध्ये 22 लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामध्ये बहुतांश आरोपींवर लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. 
 
गेल्या 20 वर्षात हा आकडा सर्वाधिक असून मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा दुसरा आणि कर्नाटकचा तिसरा क्रमांक आहे. 
महाराष्ट्रात गेल्या वर्षी 16 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून यानंतर कर्नाटकचा आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. दोन्ही राज्यात प्रत्येकी 15 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2018 या वर्षभरात सर्वोच्च न्यायालयाने 11 प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती.
गेल्या वर्षी ज्या ज्या राज्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा नाही दिली त्यामध्ये ईशान्येकडील सहा राज्यांचा समावेश आहे. याआधी 2007 मध्ये भारतामध्ये 100 लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर 2017 मध्ये 109 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली.