खात्यातून विनापरवानगी पैसे काढल्यास बँक जबाबदार - उच्च न्यायालयाने बजावले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
कोची,
ग्राहकाने एसएमएस अलर्टचे उत्तर दिले नाही तरी त्याच्या खात्यातून परवानगीशिवाय पैसे काढले असल्यास बँक जबाबदार राहील, असे न्या. पी. बी. सुरेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी संबंधित ग्राहकाची परवानगी गरजेची असेल. बँक या जबाबदारीपासून पळू शकत नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
 
 

 
 
 
माहितीनुसार, परवानगीशिवाय खात्यातून पैसे काढल्याने एका ग्राहकाचे 2.4 लाखांचे नुकसान झाले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाला त्याची भरपाई देण्याचे आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिले. मात्र, या आदेशाला बँकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. बँकेने यावर खात्यातून रक्कम काढल्याचा एसएमएस अलर्ट ग्राहकाला पाठवला होता. ग्राहकाने खाते ब्लॉक करण्यासंबंधी कळवायला हवे होते. मात्र, एसएमएस मिळाल्यानंतरही ग्राहकाने त्याला उत्तर दिले नाही. त्यामुळे त्याच्या झालेल्या नुकसानीला आम्ही जबाबदार नाही असा युक्तिवाद केला होता. ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी सावधानता बाळगणे हे बँकेचे कर्तव्य आहे. ग्राहकाच्या खात्यातून विनापरवानगी पैसे काढण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची जबाबदारी बँकेची आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. ग्राहकाच्या खात्यातून परवानगीशिवाय पैसे काढल्यास बँक स्वत:च जबाबदार राहील. कारण त्यांनी हा गुन्हा रोखण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा तयार केली नाही, असेही न्यायालय म्हणाले.