५५ वर्षे विरुद्ध ५५ महिने- पंतप्रधान मोदींचा घणाघात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
नवी दिल्ली,
विरोधी पक्षांचे काम विरोध करणे, टीका करणे आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर कितीही टीका करा, त्याला माझी हरकत नाही, मात्र तुम्ही मोदी आणि भाजपाचा विरोध करताना देशाच्या विरोधातही बोलायला लागले आहात. देशाच्या विरोधात बोलणार्‍यांची आम्ही कोणतीही दखल घेणार नाही, असा घणाघाती इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी दिला. मला 2014 मध्ये भ्रष्टाचार्‍यांना घाबरविण्यासाठीच जनतेने कौल दिला होता आणि तुम्हाला मोदींना घाबरावेच लागेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
 
 
 
 
 
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत दोन दिवस झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी कॉंगे्रससह सर्व विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढविला. विरोधी पक्षांच्या कारवायांचा खरपूस समाचार घेताना, आपल्या आक्रमक शैलीत मोदी म्हणाले की, लंडनमध्ये खोट्या आरोपांची पत्रपरिषद घेत, तुम्ही देशाची कोणती प्रतिष्ठा उंचावली आहे? मला माझ्या मर्यादेतच राहू द्या. मी जोपर्यंत माझ्या मर्यादेत आहे, तोपर्यंत तुमचे भले आहे. मोदी जे जाहीर सभेत बोलतात, तेच राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात म्हटले, या कॉंगे्रस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या आरोपांचा उल्लेख करीत, मोदी म्हणाले की, खरे बोलणारे बाहेरून आणि आतून एकच गोष्ट बोलत असतात. पंतप्रधान आणि राष्ट्रपती खरे बोलत आहेत, हे तर आता तुम्हाला मान्य करावेच लागेल; कारण आतापर्यंत तुम्हाला खोटे ऐकण्याची सवय झाली होती.
 
 
घटनात्मक संस्था 
पंतप्रधान मोदी घटनात्मक संस्थांना बर्बाद करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. यावर हल्ला चढविताना मोदी म्हणाले की, विरोधी पक्षांच्या या आरोपाने ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ या म्हणीची आठवण झाली. देशावर आणिबाणी लादली, ती कॉंगे्रसने. लष्कराचा अपमान केला, तो कॉंगे्रसने. लष्करप्रमुखाला गुंड म्हटले, ते कॉंगे्रसने. सरकार उलथवण्याबाबतचा बातम्या पसरविल्या, त्या कॉंगे्रसने आणि तरीसुद्धा तुम्ही म्हणता, मोदी देशातील घटनात्मक संस्थांना बर्बाद करीत आहेत.
 
 
आपल्या देशातील निवडणूक आयोग संपूर्ण जगात गौरवाचा आणि अभिमानाचा विषय आहे, छोट्या-मोठ्या तक्रारीनंतरही राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला मानत असतात, मात्र तुम्ही आता निवडणुकीतील आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमवर फोडत आहात, तुम्ही इतके घाबरलेले का आहात? तुम्हाला काय झाले आहे? न्यायपालिकेला कॉंगे्रस धमकावत आहे, आधी असे कधी झाले नव्हते. महाभियोगाच्या नावावर न्यायव्यवस्थेला हादरा देण्याचा प्रयत्न कॉंगे्रसने केला आणि तुम्ही आमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहात.
 
 
कलम 356
कॉंगे्रसच्या एका माजी पंतप्रधानाने योजना आयोगाला विदुषकांचा समूह म्हटले होते, याचे स्मरण करून देत, मोदी म्हणाले की, घटनेतील 356 व्या कलमाचा सर्वाधिक दुरुपयोग कॉंगे्रसने केला आहे. निवडून आलेली विरोधी पक्षांची सरकारने कॉंगे्रसने बरखास्त केली. कॉंगे्रसच्या काळात 356 व्या कलमाचा दुरुपयोग शंभरवेळा झाला, त्यापैकी 50 वेळा इंदिरा गांधी यांनी त्याचा वापर केला. 1959 मध्ये नेहरू पंतप्रधान आणि इंदिरा गांधी कॉंगे्रसच्या अध्यक्ष असताना केरळचे सरकार बरखास्त करण्यात आले होते. राहुल गांधी यांचे नाव न घेता, मोदी म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे कागद पत्रपरिषदेत फाडले जातात. त्यामुळे मोदींवर एक बोट ठेवताना, चार बोटे आपल्याकडे आहेत, याची जाणीव ठेवायला हवी.
डिसेंट खरगे
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात मल्लिकार्जुन खरगे यांचाही खरपूस समाचार घेतला. खरगे अतिशय ‘डिसेंट’ (शालीन) व्यक्ती आहेत. मात्र माहीत नाही, त्यांची काय मजबुरी आहे, ‘हर बार डिसेंट, हर बार डिसेंट’!. एका गरीब माणसाने दिल्लीच्या सत्तेला आव्हान देणे, ही बाब कॉंगे्रसवाले अजूनही पचवू शकत नाही. त्यांच्या डोक्यातून ही बाब निघत नाही. सत्तेची ही नशा कॉंगे्रसला सोडवत नाही. मोदी यांनी आपल्या भाषणात, आपल्या सरकारच्या उपलब्धींचा आढावा घेताना, या आधीच्या सरकारने केलेल्या कामगिरींचा पंचनामाही केला.
 
 
राफेल व्यवहार
राफेल व्यवहारावर कॉंगे्रस करीत असलेल्या टीकेचा उल्लेख करीत मोदी म्हणाले की, भारतीय वायुसेना सशक्त होऊ नये, अशी या पक्षाची इच्छा असल्याचा माझा गंभीर आरोप आहे. राफेलचा सौदा रद्द व्हावा, अशी तुमची इच्छा आहे, पण हा सौदा कोणत्या कंपनीसाठी रद्द करण्याची तुमची इच्छा आहे, अशी विचारणाही मोदी यांनी केली. राफेल व्यवहारावर करण्यात आलेल्या एकूणएक आरोपांची संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्‌ यांनी मुद्देसूद निराकरण केले आहे. कोणत्या लोकांसाठी देशाच्या सुरक्षेशी खेळत आहात? कॉंगे्रस पक्ष आणि कॉंग्रेस सरकारने मलाई घेतल्याशिवाय देशातील एकही संरक्षण खरेदी व्यवहार होऊ दिला नाही, याचा इतिहास साक्षी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न कॉंगे्रसच्या सदस्यांनी केला.
 
 
 
सर्जिकल स्ट्राईक
आमच्या सरकारने सर्जिकल स्ट्राईक करताच, आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले होते, असे कॉंगे्रसचे नेते सांगू लागले; मात्र तुमच्या काळात तर तुम्ही लष्कराला नि:शस्त्र करून टाकले होते आणि आता सर्जिकल स्ट्राईकच्या गोष्टी करीत आहात, तुमच्या कार्यकाळात लष्कराजवळ बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट, चांगले बूट आणि दळणवळणाची साधनेही नव्हती. 2009 मध्ये लष्कराने 1.86 लाख बुलेटप्रूफ जॅकेट्‌सच मागणी केली होती, पण 2014 पर्यंत याची खरेदी झाली नव्हती. 2016 आणि 2018 मध्ये आम्ही लष्कराला बुलेटप्रूफ जॅकेट्‌स दिले. लष्कराच्या जवानांबद्दल कॉंगे्रसची वागणूक एवढी संवेदनाहिन का होती, याचे उत्तर कॉंगे्रसने दिले पाहिजे. सुदैवाने, त्यावेळी आमच्या शत्रूदेशाने काही केले नाही, अन्यथा आमची स्थिती काय राहिली असती, याची कल्पनाही करवत नाही.
महाभेसळ
विरोधी पक्षांच्या महाआघाडीवर मोदी यांनी सडकून हल्ला चढविला. जेव्हा महाभेसळ असलेले सरकार असते, तेव्हा देशाची अधोगती होते. देशवासीयांनी अनेकदा याचा अनुभव घेतला आहे. आमचे सरकार बहुमत असल्यामुळे ते देशवासीयांसाठी समर्पित आहे. कॉंग्रेस प्रत्येक निवडणुकांच्या वेळी एकच जाहीरनामा प्रसिद्ध करीत असतो. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेली वचने आमच्या सरकारने पूर्ण केली, असा टोला मोदी यांनी हाणला. तुमची 55 वर्षे आणि माझे फक्त 55 महिने. तेव्हा मोदींकडे बोट दाखविण्यापूर्वी आपला भूतकाळ तपासा, असा टोला त्यांनी लगावला.
 
 
 
पारदर्शक
माझे सरकार पारदर्शक म्हणून ओळखले जाते. गरिबांसाठी झटणारे, राष्ट्रहिताला प्राथमिकता देणारे, भ्रष्टाचारावर कारवाई करणारे आणि वेगाने काम करणारे, अशी माझ्या सरकारची ओळख आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
 
 
 
निवडणुकीचे वर्ष
हे वर्ष निवडणुकीचे असल्याने काही ना काही बोलावे लागतेच, नाईलाज असणे साहजिक आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी मोदी यांनी लोकसभेसाठी पहिल्यांदाच मतदान कऱणार्‍या तरुण मतदारांना शुभेच्छा दिल्या. नवीन पिढी देशाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वास व्यक्त केला.
गांधीजींची इच्छा
कॉंग्रेसमुक्त भारत ही तर गांधीजींची इच्छा होती, मी फक्त त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहे. तुम्ही कॉंगे्रसवाले जर गांधीजींचे भक्त असाल, तर त्यांची इच्छा पूर्ण करा, असे सांगताना, कॉंग्रेसमध्ये सामील होणे आत्महत्या करण्यासारखे आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
बेनामी कंपन्यांचा पर्दाफाश
 
 
 
माझ्या सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या धाडसी निर्णयामुळे देशातील तीन लाख बेनामी कंपन्या बंद पडल्या. असंख्या बेनामी संपत्ती समोर आली, अजूनही अशी प्रकरणे समोर येत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
 
 
महागाईवर गाणी
देशात जेव्हा जेव्हा कॉंग्रेस सरकार सत्तेत होते, तेव्हा महागाई होती, परंतु गेल्या साडेचार वर्षांपासून महागाईचा दर केवळ 4 टक्के आहे. आधीच्या काळात महागाईवर गाणी का तयार झाली, असा सवाल करीत मोदी यांनी ‘बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई,’ या गाण्याची विशेष आठवण केली. इंदिरा गांधी यांची सत्ता असताना ‘बाकी कुछ बचा तो, महंगाई मार गयी’ हे गाणे आले होते; तर दुसरे गाणे ‘महंगाई डायन खायें जात है’ हे संपुआच्या रिमोट कंट्रोल सरकारमध्ये आले होते आणि प्रचंड प्रसिद्ध झाले होते. महागाई आणि कॉंग्रेस यांचे अत्यंत जवळचे नाते आहे, हे लक्षात ठेवा, असा चिमटाही त्यांनी काढला. यावेळी सभागृहात एकच हशा पिकल्या. दुधावर कर लावणार्‍या कॉंग्रेसने जीएसटीबाबत बोलू नये. कारण, जीएसटीमुळे अत्यावश्यक वस्तू करांच्या बाहेर गेल्या आहेत, 99 टक्के वस्तूंवर 18 टक्यांपेक्षा कमी जीएसटी आहे, असे त्यांनी सांगितले.
 
 
विरोधकांचे चेहरे
लोकसभेत पंतप्रधान मोदी उत्तर देत असताना, विरोधकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते, तर सत्तारूढ बाकांवरील सदस्य बाके वाजवून पंतप्रधानांना दाद देत होते.