महाराष्ट्रात 28 लाख मतदार वाढले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
मुंबई,
निवडणूक आयोगाने राज्याची अंतिम मतदार यादी नुकतीच जाहीर केली असून, यानुसार 31 जानेवारी 2019 पर्यंत राज्यात 28 लाख 39 हजार मतदारांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 

 
 
 
येत्या लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नव्या मतदारांचा समावेश व्हावा म्हणून निवडणूक आयोगाने मतदार याद्यांची पुनर्रचना केली. त्यानुसार राज्यात एकूण 35 लाख 68 हजार 352 मतदार वाढले. यात 17 लाख 43 हजार 259 पुरुष तर 18 लाख 24 हजार 976 महिला मतदारांचा समावेश आहे. याचवेळी सात लाख नऊ हजार 335 मतदार कमी झाले. यात तीन लाख 86 हजार 398 पुरुष तर तीन लाख 42 हजार 922 मतदारांचा समावेश आहे. मतदारांची वाढलेली आणि घटलेली संख्या लक्षात घेता राज्यात एकूण 28 लाख 39 हजार 17 मतदारांची वाढ झाली.
 
 
 
 
 
नव्या मतदारांची नावे नोंदविण्यात ठाणे जिल्हा आघाडीवर राहिला. ठाण्यात दोन लाख 97 हजार 920 नवीन मतदार नोंदवले गेले. त्याचवेळी 93 हजार 524 मतदार कमी झाले. त्याखालोखाल मुंबई उपनगराचा क्रमांक लागतो. तेथे दोन लाख 27 हजार 988 नवीन मतदार नोंदवले गेले. त्याचवेळी मुंबई उपनगरात 45 हजार 142 मतदार कमी झाले. पुणे जिल्ह्यात दोन लाख 888 मतदार वाढले तर 26 हजार 421 मतदार कमी झाले. नाशिक जिल्ह्यात दोन लाख आठ हजार 724 मतदार वाढले तर 31 हजार 125 मतदार कमी झाले. िंसधुदूर्ग जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 14 हजार 265 नवीन मतदार नोंदवले गेले. त्याचवेळी तेथे सहा हजार 151 मतदार कमी झाले.
 
 
राज्यात एकूण मतदार 8 कोटींवर
मतदारयाद्यांची पुनर्रचना झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील एकूण मतदारांची संख्या आठ कोटी 73 लाख 30 हजार 484 झाली. यात चार कोटी 57 लाख दोन हजार 579 पुरुष तर चार कोटी 16 लाख 25 हजार 819 महिला मतदारांचा समावेश आहे. आता सर्वांत जास्त मतदार पुणे जिल्ह्यात असून, त्यांची संख्या 73 लाख 63 हजार 812 आहे. सर्वात कमी मतदार िंसधुदूर्ग जिल्ह्यात असून, त्यांची संख्या सहा लाख 59 हजार 757 आहे.