कर्ज स्वस्त होणार; सर्वसामान्यांसाठी खुशखबर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
 
 
 
 
 
 
रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर झाले असून कर्ज स्वस्त झाल्याची खुशखबर सर्वसामन्य जनतेला मिळाली आहे.  अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर ६.२५ टक्के तर रिव्हर्स रेपो दर ६ टक्के झाला आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होणार आहेत. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत ही घोषणा केली. २८ जानेवारी रोजी सरकारी बँकांसोबत झालेल्या बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दर कमी करण्याचे संकेत दिले होते.
 तसेच सध्या सुरु असलेल्या कर्जांवरील व्याजदरही कमी होणार असल्याने बँकेचा हप्ताही कमी होणार आहे. दरम्यान, यंदाच्या २०१९-२०च्या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर हा ७.४ राहण्याची शक्यता आरबीआयने वर्तवली आहे. त्याचबरोबर महागाईचा दर ३.२ टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पहिल्या सहामाहित हा दर ते ३.४ आणि तिमाहित ३.९ टक्के दर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसेच शेतकऱ्यांसाठीही रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला असून त्यांच्यासाठी बिनव्याजी कर्जाच्या रकमेत सुमारे ८० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या कर्जाची मर्यादा १ लाख ८० हजार रुपये झाली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने अंतरिम बजेटमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दुसऱ्यांदा शेतकऱ्यांसाठी खुशखबर मिळाली आहे.
गव्हर्नरपदी विराजमान झाल्यानंतर शक्तीकांत दास यांची पतधोरण समितीची ही पहिलीच बैठक होती.