विदर्भ सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक विजेता
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
 
 - फिरकीपटू आदित्य सरवटेचे दोन्ही डावांत मिळून ११ बळी 
  
 
नागपूर, 
 
कर्णधार फैजल फजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रावर ७८ धावांनी मात केली. विदर्भाने विजयासाठी दिलेले २०७ धावांचे आव्हान पार करताना सौराष्ट्राचा संघ १२७ धावांपर्यंतच मजल मारु शकला. फिरकीपटू आदित्य सरवटेने विदर्भाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पहिल्या डावात सौराष्ट्राच्या ५ फलंदाजांना माघारी पाठवणाऱ्या आदित्यने दुसऱ्या डावातही सौराष्ट्राच्या ६ फलंदाजांना बाद केले. 
 
 
 
सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत विदर्भाच्या कर्णेवारच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर विदर्भाने पहिल्या डावात ३१२ धावांपर्यंत मजल मारली. मधल्या फळीतल्या फलंदाजांनीही विदर्भाची धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. प्रत्युत्तरादाखल सौराष्ट्रने स्नेल पटेलने शतकच्या बळावर पहिल्या डावात ३०७ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, कर्णधार जयदेव उनाडकट आणि चेतन साकरिया यांनी अखेरच्या गड्यासाठी बहुमोल भागीदारी रचत विदर्भाला फार आघाडी मिळणार नाही याची खबरदारी घेतली. सरवटे आणि आणि अक्षय वाखरेच्या भेदक माऱ्यामुळे विदर्भाने पहिल्या डावात ५ धावांची निसटती आघाडी मिळाली. 
 
 
 
दुसऱ्या डावात विदर्भाच्या संघातील अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला आणि सौराष्ट्रला विजयासाठी २०६ धावांचे आव्हान देण्यात आले.
 
पहिल्या डावात शतक झळकावणारा स्नेल पटेल दुसऱ्या डावात अवघ्या १२ धावांवर बाद झाला. यानंतर आदित्य सरवटेने चेतेश्वर पुजाराला शून्यावर बाद करून सौराष्ट्राला मोठा धक्का दिला. यामुळे चौथ्या दिवसअखेर सौराष्ट्रची अवस्था ५ बाद ५८ अशी झाली. पाचव्या दिवशी विश्वराज जाडेजाने अर्धशतकी खेळी करत विदर्भाला झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याने ५२ धावांची खेळी केली. मात्र तो माघारी परतल्यानंतर इतर फलंदाज जास्तकाळ खळपट्टीवर टॅग धरू शकले नाही. दुसऱ्या डावात विदर्भाकडून आदित्य सरवटेने पुन्हा एकदा आपली चमक दाखवत ६ फलंदाजांना बाद केले.  तसेच अक्षय वखरेने ३ तर उमेश यादवने १ बळी घेत चांगली त्याला चांगली साथ दिली.