भारतात व्हॉट्‌सॲप बंद होण्याची शक्यता
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :07-Feb-2019
नवी दिल्ली,
 
भारतात काम करीत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित करण्यात आलेले काही नियम लागू करण्यात आले, तर भारतातील व्हॉट्‌सॲपचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता कंपनीच्या एका अधिकार्‍याने व्यक्त केली आहे. याबाबत माहिती देताना तो म्हणाला की, २० कोटी यूजर्स असल्याने व्हॉट्‌सॲपसाठी भारत सर्वांत मोठी बाजारपेठ आहे, तर जगभरात आमचे १.५ अब्ज यूजर्स आहेत. प्रस्तावित नियम हा खूप चिंतेचा विषय असल्याचे मत व्हॉट्‌सॲप कम्युनिकेशनचे प्रमुख कार्ल वूग यांनी व्यक्त केले आहे. बुधवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या मीडिया कार्यशाळेत कार्ल वूग बोलत होते.
 
 

 
 
प्रस्तावित नियमातील सर्वांत चिंतेचा विषय म्हणजे मॅसेजेसचा शोध घेणे, म्हणजेच त्याच्या स्रोताचा उगम शोधण्यावर भर देणे. फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्‌सॲप मूलभूत रीत्या एंड-टू-एंड एनक्रिप्शन करते. म्हणजेच मॅसेज पाठविणारा आणि प्राप्त करणारा या दोघांनाच तो वाचता येणार आहे. आम्हालाही तो मॅसेज वाचता येणार नाही, असे वूग यांनी सांगितले.
 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे प्रवक्ते असलेले वूग म्हणाले की, प्रस्तावित नियम लागू होत आहेत; परंतु ते मजबूत गोपनीयतेच्या सुरक्षेच्या अनुरूप नाहीत. आम्ही एंड-टू-एंड एनक्रिप्शन पुरवतो, पण नव्या नियमानुसार आम्हाला आमच्या उत्पादनाची पुनर्बांधणी करावी लागेल. अशा स्थितीत संदेश (मॅसेज) सेवा सध्याच्या रूपात देता येणार नाही.
 
हे नवीन नियम लागू झाल्यानंतर भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याची शक्यता न फेटाळता त्यांनी सांगितले की, यावर अंदाज बांधून काहीही होणार नाही. या विषयावर भारतात चर्चा करण्यासाठी एक प्रकिया सुरू आहे. एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचरमुळे तपास यंत्रणांना अफवा पसरवणार्‍यांपर्यंत पोहोचणे कठीण जाते. सोशल मीडिया प्लॅटफार्मसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रस्तावित नियमांतर्गत त्याच्या सेवांचा दुरुपयोग आणि हिंसा पसरवणार्‍यांपासून रोखण्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन करावे लागणार आहे.