मी प्रामाणिकपणे आंदोलने करत राहणार : अण्णा हजारे
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
 
 
अहमदनगर,
कोणाला जे म्हणायचे ते म्हणा, पण मी प्रामाणिकपणे आंदोलने करत राहणार असल्याचे मत अण्णांनी व्यक्त केले आहे. तसेच, २०११ मधील आंदोलनापेक्षा आता राळेगणसिद्धीमध्ये झालेल्या आंदोलनात गर्दी कमी झाल्याचे अण्णांनी मान्य केले. याला त्यावेळी जुळून आलेल्या टीम अण्णांतील अनेकांच्या वैयक्तिक महत्वकांक्षा कारणीभूत असल्याची खंत अण्णा हजारेंनी व्यक्त केली.
 
उपोषण सोडल्यानंतर अण्णांची तब्येत आता पूर्ववत होत असली तरी त्यांच्या चेहऱ्यावर आंदोलनाचा थकवा जाणवत आहे. आंदोलन आश्वासनावर सुटल्याबद्दल सध्या सोशल मीडियातून अण्णांवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यात टीकात्मक प्रतिक्रियेबरोबरच कमी गर्दीचा संदर्भ जास्त येत आहे. यावर अण्णांना विचारले असता अण्णांनी राळेगण सिद्धीच्या आंदोलनात २०११ सालच्या रामलीला आंदोलनापेक्षा कमी गर्दी असल्याचे मान्य केले.

 
२०११ ला झालेल्या आंदोलनावेळी जुळून आलेल्या टीम अण्णांकडून देशाला मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. पण त्यानंतर टीम अण्णांतील कुणाला मुख्यमंत्री व्हायचे होते, कुणाला राज्यपाल, तर कुणाला मंत्री व्हायचे होते. या वैयक्तिक आकांक्षेपोटी जनतेमध्ये निर्माण झालेला विश्वास तुटला गेला. यात देशाचे नुकसान झाल्याची खंत अण्णांनी व्यक्त केली. मात्र, मला काय, मी एक फकीर माणूस आहे. मंदिरात राहतो. मी पूर्वीप्रमाणेच जनहितासाठी आंदोलने करत राहणार असल्याचे अण्णांनी सांगितले. या आंदोलनाला गर्दी कमी असली, तरी सरकारला आंदोलनाची दखल घ्यावी लागली आहे. वेळ पडली तर पुढेही आंदोलने करणारच असेही ते म्हणाले.