नात्यांची वीण सैल होतेय्‌...
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!’ असे म्हटले जाते, ते काही खोटे नाही. तिन्ही जगाचा स्वामी आईविना मात्र भिकारीच असतो. याच अनुषंगाने ‘दिवार’ सिनेमातील शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यातील संवाद आठवतो, अमिताभ शशी कपूरला तावाने विचारतोे, ‘‘मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है. तुम्हारे पास क्या है?’’ शशी कपूर थंडपणे म्हणतो, ‘‘मेरे पास मॉं है!’’ इतकी त्या आईची महिमा अगाध आहे.
 
प्रियकर-प्रेयसी बागेत बोलत असतात. प्रेयसी प्रियकराला म्हणते, ‘‘तू माझ्यासाठी तुझ्या आईचे काळीज आणू शकतो का?’’ प्रियकर लगेच आईजवळ जाऊन आपल्या प्रेयसीची मागणी सांगतो. आई क्षणाचाही विलंब न करता स्वत:चे काळीज काढून मुलाच्या हातात देते. काळीज घेऊन जात असताना मुलाला अचानक ठेच लागते. आईचेच काळीज ते, मुलाला ठेच लागताच त्यातून आवाज येतो, ‘‘बाळा तुला लागले तर नाही ना?’’ ही कथा अनेकदा सांगितली जाते. त्यात अतिशयोक्ती वाटते, मात्र तो श्लेष आहे. त्यातला संकेत विचारात घेतला, तर आईचे मन मुलासाठी कसे कळवळत असते, हे लक्षात घ्यावे.
जन्मदात्री आईच नाही तर वडीलही तितकेच महत्त्वाचे. वात्सल्यात जशी आईची कुणी बरोबरी करू शकत नाही, तसेच पालनपोषणात वडिलांची कुणीही बरोबरी करू शकत नाही. या दोन महत्त्वाच्या नात्यांबरोबरच भाऊ, बहीण, मामा, काका, आत्या, मावशी ही नातीही नात्यांची वीण घट्‌ट करणारीच. आईचा भाऊ मामा. मामा म्हटले की, ‘झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या...’ हे गाणे अजूनही अनेकांना आठवते, हे काही कमी नाही. मामाच्या गावातील आमरायांमध्ये दिवस-दिवसभर खेळण्याची, हुंदडण्याची मजाच और होती. आमरस, पापड, सांडया, कुरडया खाण्याची लज्जत वेगळीच. मामीदेखील तेवढीच प्रेमळ असायची. आता मात्र अनेक मामा शकुनी झाल्याचे दिसते. नातीच संपली ना! पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे भावा-बहिणींमध्ये प्रेमाचे संबंध होते. काका, काकू, त्यांची मुले-मुली असा सारा गोतावळा असायचा. आत्या, मावशी (पूतना नव्हे!) त्यांची मुले-मुली अशी एक ना अनेक नाती जपली जायची. आता तर उच्चविद्याविभूषित मुलगाच शिक्षकी पेशातील वडिलांचा, तेही पैशांसाठी जीव घेण्यास मागेपुढे पाहात नाही! जावयाचा सासर्‍यावर हल्ला, बायकोने काढला नवर्‍याचा काटा, अशा घटना वाचण्यात आल्या की, नात्यांची वीण खूपच सैल झाल्याचे वाटून जाते.
 
काळ बदलत गेला तशा नात्यांच्या विणीही सैल होत गेल्या. सख्खे भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण, मुलगा-वडील हीच नाती सध्या उरलेली नाहीत. त्यामुळे काका, काकू, आत्या, मावशी ही नाती नावापुरतीच राहिली आहेत. येत्या काही दिवसांत मुलांना हे शिकवावे लागेल की, जन्मदाते आई-वडील, आईचा भाऊ मामा, वडिलांचे भाऊ काका, वडिलांची बहीण आत्या, आईची बहीण मावशी. वीण इतकी सैल झाली (इस्टेटीच्या भांडणामुळे) की, सख्खा भाऊ सख्ख्या भावाचा बळी घेण्यास मागे-पुढे पाहात नाही! पूर्वीही हेवेदावे, स्वार्थ आजच्यासारखाच होता. परंतु प्रमाण कमी होते, असे म्हणता येईल. पूर्वी काय िंकवा सध्याच्या काळात काय, ज्या नात्यांची जपणूक झाली नाही, ती नाती बदनाम झाली.

 
 
कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची सात मुले मारून टाकली. परंतु, कंसाच्या हातून सुटलेल्या देवकीच्या आठव्या अपत्याने केलेल्या आकाशवाणीनुसार कंसाचा वध झाला. भाच्यांना युद्धासाठी उद्युक्त करणारा शकुनिमामा घ्या िंकवा कंस मामा घ्या, त्या वेळी तर सोडा, अजूनही कुणी या दोघांना चांगल्या नजरेने पाहात नाही. कैकेयीने आपल्या मुलाला राजगादी मिळावी म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांना वनवासात पाठविले. अजूनही कैकेयी हे नाव कुण्या महिलेचे ठेवलेले दिसत नाही. मुलांच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या धृतराष्ट्राने पुतण्यांविरोधात जाऊन अधर्माला साथ दिली. मावशी बनून दुधाऐवजी विष पाजणार्‍या पूतना मावशीचे नातेही कुणी सांगत नाही. स्वार्थ, अहंकारापोटी नात्यांना दुय्यम समजणार्‍यांचे नाव कुणी घेत नव्हते आणि आजदेखील घेत नाही. परंतु मैत्री कशी असावी, याचे उत्तम उदाहरण म्हणून आजही श्रीकृष्ण-सुदामा यांच्या मैत्रीचा दाखला दिला जातो. एकंदरीत ज्या ज्या वेळी स्वार्थ, अहंकार नात्यात आला, त्या त्या वेळी घात झाला आणि ती नातीच बदनाम झाली आणि त्या नात्यांना लागलेला कलंक पुन्हा कधीच पुसला जाऊ शकला नाही. पूर्वीही स्वार्थ होता, आजही आहे. पूर्वीदेखील नीतिमत्ता ओलांडणारी नाती बदनाम झाली, आजही होताहेत, हे दुर्दैवच. अजूनही कंस, शकुनिमामा, पूतना मावशीसारखी नाती ठेवणारी माणसे या जगात आहेत, हे पाहून वाईट वाटते. भारत देशात तर सोडा, महाराष्ट्र राज्यातील एकट्या भंडारा जिल्ह्यात 15 दिवसांत नातेवाईकांनीच घात केल्याच्या अनेक घटना घडल्या. यावरून सार्‍या जगातील घटनांची कल्पना येऊ शकते. तुमसर येथील घटनेत, ढिवरटोला येथील घटनेत चक्क मुलाने बापाला यमसदनी धाडल्याची, जावयाने सासर्‍यावर हल्ला करण्याची घटना घडली. भरीस भर अड्याळ पोलिस ठाण्यांतर्गत कोंढा येथे घडलेल्या घटनेत तर उच्चशिक्षित मुलाने चक्क शिक्षक बापाचा काटा काढला! नाते या शब्दाला जेवढ्या सोप्या पद्धतीने पाहिले जाते, तितके ते सोपे नाही. नाते निभवणे ही फार मोठी गोष्ट आहे. स्वार्थ, अहंकाराला बाजूला करून नात्यांना महत्त्व देणाराच खर्‍या अर्थाने नातेवाईक होऊ शकतो. नि:स्वार्थ व्यक्तीशीच नात्याची वीण घट्‌ट होऊ शकते. उच्चविद्याविभूषित मुलाने पैशांसाठी वडिलांचा जीव घेणे, यापेक्षा दुर्दैवी घटना ती कोणती? मारणारा आपला कुणी नाही, ज्याला मारण्यात आले, तोदेखील आपला कुणी नाही, हे जरी खरे असले, तरी सामाजिक स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी या गोष्टींकडे सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने बारकाईने पाहणे गरजेचे आहे. अन्यथा समाजात अराजकता माजेल. ज्याला नातेच सांभाळता येत नाही, त्याच्याकडून फारशा अपेक्षा करता येऊ शकत नाहीत. वर्तमानपत्रांमध्ये गुन्हेगारीच्या घटना नेहमीच येत असतात. गुन्हेगारीच्या घटना, एवढेच त्याकडे पाहून चालणार नाही. सामाजिक भान ठेवत अशा गुन्हेगारीच्या घटनांकडे पाहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना जन्म देणारे माता-पिता, आईचा भाऊ मामा, वडिलांचे भाऊ काका, आईची बहीण मावशी, वडिलांची बहीण आत्या ही नाती नुसतीच शिकवून चालणार नाही, तर त्या त्या नात्याचे जीवनातील महत्त्वदेखील वेळोवेळी मुलांसमोर अधोरेखित होणे आवश्यक आहे. त्यासाठीच भारतीय संस्कृतीत वेगवेगळे सण आहेत. बहीण-भावाचा राखीचा सण, पाडव्याला मुलीकडून वडिलांचा मान, मातृपितृदिन, लग्नामध्ये होणारा नणंदेचा मान, आत्याच्या मांडीवर जावळे काढण्याची पद्धत, लग्नाच्या वेळी नवरदेव-नवरीच्या मागे उभे राहण्याचा मामाचा मान, भाचा, भाची पहिल्यांदा जेवायला सुरुवात करतात ते मामाच्याच मांडीवर (ज्याला उष्टावण म्हणतात). असे म्हणतात की, मामाच्या घरी भाचा जेवला म्हणजे काशीला जाण्याचे पुण्य मिळते. असेही म्हणतात की, एका नावेत काका-पुतण्या नको. असल्यास नाव उलटण्याची भीती असते. म्हणजेच काय, काका-पुतण्या यांच्यातील नाते येथे अधोरेखित झाले आहे. असा प्रत्येक नात्याचा कुठल्या तरी सणाशी म्हणा िंकवा एखाद्या कार्यप्रसंगाशी म्हणा, संबंध जोडण्यात आला आहे. उद्देश एवढाच की, या निमित्ताने तरी नाती जपली जावी. परंतु, आताशा सणवारांचे महत्त्व कमी होत चालले आहे. समारंभही आटोपते घेतले जात असल्याने या परंपरांना पुढे येण्यास वावच राहिलेला नाही. पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरी सुबत्ता होती. एका भावाकडे 25 एकर, तर दुसर्‍या भावाकडेदेखील तेवढीच शेती होती. बहीण-भाऊदेखील सधन असण्यासह दोघांमध्ये स्पर्धा नसल्यामुळे नाते तुटण्याचा प्रश्नच येत नव्हता. वडिलांच्या मोठ्या भावालादेखील मान होता. परंतु, नाती संपल्याने मामाविना लग्न, आत्याच्या मांडीविना जावळे, बहीण-भावाविना राखी पाहण्याचे दुर्दैव आले आहे.
 
सध्या जगात चालले आहे, ते थांबणे गरजेचे आहे. सध्या प्रत्येक आई-वडिलाचे स्वप्न आहे- माझा मुलगा उच्चविद्याविभूषित होऊन परदेशात गेला पाहिजे. आई-वडिलांनी हे स्वप्न पाहिलेच पाहिजे, यात शंका नाही. परंतु, उच्चशिक्षण घेऊन परदेशात गेला ना मुलगा, की फक्त संवादाच्याच कामाचा राहून जातो, हे आई-वडील विसरत आहेत. वधू पाहण्याचा कार्यक्रमदेखील परदेशातून स्वदेशी जेव्हा-केव्हा येईल तेव्हा उरकला जातो. परदेशस्थ मुलाचे आई-वडिलांशीच नाते कमी झालेले असते. त्यामुळे इतर नाती त्या मुलासाठी नावापुरत्या राहिल्या असतात. प्रत्येक भारतीय मुलगा शिक्षणाने मोठा झालाच पाहिजे. उच्चशिक्षण तर हवेच, शिवाय मूल्यावर्धित शिक्षणाची आवश्यकतादेखील वाटू लागली आहे.
- आनंद विनायक मोहरील