माचीवरला बुधा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
माचीवरला बुधा ही गो. नि. दांडेकरांची कादंबरी आठव्या - नवव्या वर्गांत असताना वाचल्याचे आठवते. त्यावेळी आम्ही तालुक्याच्या गावांत राहयचो. आजपासून साधारण तीस- पस्तीस वर्षांपूर्वीचा तो काळ होता. गावांत एक वाचनालय होते. लोक वाचायचेही. पुलं, विसं, फडके वगैरे परवलीचे शब्द होते. घरी आई त्या वाचनायलयातून पुस्तके आणायची. नवा चित्रपट गावांत यायला दोन वर्षे तरी लागायची. शोलेची खूप चर्चा होती. अगदी आमच्या गावाच्या बस स्थानकावरच्या ‘हटेल’वर त्याच्या संवादाच्या ध्वनिफिती वाजायच्या सकाळ- संध्याकाळ आणि कार्यक्रम असल्यागत लोक गोळा होऊन ऐकायचे ते संवाद... शोले आमच्या गावांत यायला पाच वर्षे लागली... मात्र, नवी चर्चेत असलेली पुस्तके झापाट्याने आमच्या गावाच्या वाचनालयांत यायची. माचीवरला बुधा हे पुस्तक नवेकोरे वाचनालयांत आले आणि आईने ते घरी वाचायला आणले. फार जड नव्हते. आकारानेही लहान चणीचे अन्‌ मुखपृष्ठ पाहून आवडलेच ते. आई मग काही पुस्तके वाचण्याची परवानगी द्यायची. ही कादंबरी वाचण्याची तशीच परवानगी मिळाली होती.
 
आता निसर्ग अन्‌ पर्यावरणाच्या बाबत आम्ही कमालीचे जागृक झालो असल्याचा किमान देखावा निर्माण करतो. हे सारेच बौद्धीक पातळीवर आहे, असे वाटते. त्याच्याशी आमचे भावनिक अनुबंध जुळलेले नाहीत. शालेय अभ्यासक्रमांत पर्यावरण शिकणार्‍या मुलांना हे पुस्तक नक्कीच वाचायला द्यायला हवे. त्यातून निसर्गाबद्दल, वनराईबद्दल अन्‌ पर्यावरणाबद्दल एक हळवी जाणीव निर्माण होईल... अत्यंत साधी, सोपी आणि सरळ भाषा आहे. खूप अलंकारीक असे काही करण्यात आले नाही. दांडेकरांचे प्रतिपादनशैली थेट आहे. निर्मळ मनाने ते सारे सांगून टाकत असतात अन्‌ त्यांना जे काय सांगायचे असते त्याच्याशी ते तद्रुप झालेले असतात आधी. लेखकीय अभिनिवेश नावाचा प्रकार नसतो. हे पुस्तकही त्यातलेच.
एक बुधा नावाचा निवृत्त ज्येष्ठ, शहरांत त्याच्या मुलाच्या घरी राहतो आहे. त्याची पाळेमुळे मात्र कोकणांत खूप आतवरच्या एका गावांत रुजलेली आहेत. त्याला शहरांतल्या या गदारोळांत घुसमटल्यागत होते. सून चांगली असते. मुलगाही नीट वागणारा असतो. तरीही म्हातारा अस्वस्थ असतो. एक दिवस तो त्याच्या गावाची वाट धरतो. मुलाला वाटते, या वयांतले हे वेड आहे. चार दिवस राहतील अन्‌ परततील अण्णा... पण हा म्हातारा गावाकडे येतो आणि मग तिथल्याच निसर्गात विलीन होतो. आम्ही माती, पाणी, हवा, प्रकाश, आकाश या पंचमहाभूतातून आलो आहोत अन्‌ तिथेच विलीन होणार आहोत... मात्र तसे होत नाही. बुधा मात्र खर्‍या अर्थाने त्यात विलीन होतो.
 
हे इतकेच काय ते कथानक. माणूस म्हणून पात्रे फार नाही. मुलगा, सून अन्‌ गावातली काही मंडळी... तीही बुधाच्या या निसर्गायनाच्या वाटेवर िंकवा वाटेत आली तीच. बुधा गावांत येतो. त्याचे शेत ओसाड पडलेले. घर मोडकळीस आलेले. गावातली मंडळीही त्याला गावात काय पडले आहे, असेच सांगतात. तो मात्र त्याचे घर नव्याने उभारून घेतो. त्यासाठी हातातली सोन्याची अंगठी मोडतो. माणसाच्या जगण्याच्या गरजाच त्या किती? माणूस निसर्गाचा झाला तर निसर्ग त्याला काहीच कमी करत नाही. दिलीप कुळकर्णी यांच्या शाश्वत जीन पद्धतीची आठवण ही कादंबरी वाचताना यावेळी आली. बुधा त्या निसर्गाचा एक भाग होतो. परिसर कोकणाचा. भाषाही तिकडचीच मात्र कुठेही परकेपणा जाणवत नाही. एकतर ज्या वयांत आणि भोवतालांत मी ही कादंबरी पहिल्यांदा वाचली त्याच्याशी हे सारेच जुळणारे होते. बुधासारखी माणसं दिसत होती डोळ्यांनी. त्यामुळेही काहीच परकेपणा वाटला नाही. नाहीतर चार दिवस वनपर्यटन िंकवा वननिवासाला जायचे अन्‌ कित्तीना हे सगळे छान, म्हणत परत यायचे असले जीणे असलेल्यांना ही कदंबरी वाचताना तिथे इंटरनेट नव्हते का िंकवा प्लास्टीकचा साधा उल्लेखही नाही, असले प्रश्न पडू शकतात.
 
 बुधा मग त्याचा परिवार तिथे जमवतो. त्यात त्याचे आवळीचे झाड असते, फुलांची झाडे असतात, पोटाला लागेल इतकीच भाताची शेती तो करतो. एक कुत्र्याचे पिलू एका थंडीभरल्या रात्र त्याच्या आसर्‍याला येते अन्‌ मग ते कुत्रे त्याचे सहजीवक होऊन जाते. त्याला बुधाचे मौनही कळते. कधी काळी रात्री आसर्‍याला आलेली जखमी म्हैस अन्‌ तिच्या खोल जखमेवर उपचार केल्यावर तीही बुधाच्या परिवारांत सामील होते. पाखरं, वानरांच्या टोळ्या, रानातले प्राणी हे सारेच बुधाचे विश्व असते. पाखरांची गाणी त्याला जागे करतात, तो त्यांच्यासोबत गातो, जनावरे त्याला सोबत करतात, रानात हरविला तर मार्ग दाखवितात... गावापसून दूर रानांतच त्याच्या शेतांत तो राहतो. मध्येच काळजीने त्याचा लेक त्याला घ्यायला येतो, मात्र बुधा त्याच्यासोबत काही जात नाही... जसे एक एक त्याच्यासोबत जुळतात तसेच ते त्याची निसर्गाच्या नियमानं आणि क्रमानं त्याला सोडूनही जातात. त्याच्या कुत्र्याला वाघ ओढून नेतो. म्हैस कड्यावरून कोसळते... तिला वाचवायला बुधा धडपडत असताना तोही कोसळतो. जखमी होतो आणि मग त्याचे श्वासही त्याला सोडून जातात... बुधाची माती होते, विलीन होतो तो त्याच्या या हरीतजगांत... गावकर्‍यांना कळते तेव्हा बुधा खर्‍या अर्थाने खूप दूर निघून गेला असतो. त्याचे शरीरही तसे उरलेले नसते...
वाचताना हे सगळेच इतके जीवंत साकार होत जाते की ते आवळीचे झाडही आपल्याला जाणवते. त्याच्या कच्च्या घराच्या सांदीपांदीतून येाणार रात्रीचा गार वाराही आपल्याला झोंबतो आणि त्याचे कुत्रे वाघ उचलून नेतो तेव्हा कुत्र्याच्या मानेत वाघाचे दात रुततात तेव्हा कचकणारे विव्हळणे आपल्या अंगावर शहारे आणते...
मध्यंतरी एक चित्रपटही या कादंबरीवर आला. अर्थात चित्रपटगृहांत तो प्रदर्शित झालाच नाही. गावोगावी नेत हा चित्रपट दाखविला गेला. खूप मेहनत घेवूनही कादंबरीचा अवकाश चित्रपटांत साकार होऊ शकला नाही. त्यानंतर पुन्हा ही कादंबरी वाचताना जाणवलं की पृष्ठसंख्या अगदीच ऐंशी असलेली कादंबरी हजारो पानांतही व्यक्त होता येणार नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त व्यक्त होऊन जाते...
रोहिणी पंडीत