दुष्काळात तग धरणार्‍या पीकपद्धतीची आवश्यकता
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019

  • पाशा पटेल यांचे प्रतिपादन
  • वरुडमध्ये राष्ट्रीय कृषी विकास परिषदेचे उदघाटन
वरूड,
दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी दुष्काळात तग धरुन राहणा-या व उत्पन्न देणारी पीके घेतली गेली पाहिजेत. अशी पीकपद्धती रुजविण्यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
 
वरुड येथे आजपासून आयोजित राष्ट्रीय कृषी विकास परिषदेचे उदघाटन करताना ते बोलत होते. आमदार डॉ अनिल बोंडे, सिनेअभिनेते मकरंद अनासपूरे, भारत गणेशपूरे, डॉ वसुधा बोंडे, नगराध्यक्ष स्वाती आंडे, रुपेश मांडवे, योगेश्वर खासबागे, माजी नगराध्यक्ष रवींद्र थोरात, रामराव वानखडे, सुभाष गोरडे, दुर्वास पाटील, भाजपा महिला अध्यक्ष अंजली तुमराम, ज्योती कुकडे, मोरेश्वर वानखडे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडूतालुका कृषी अधिकारी उज्वल आगरकर, तहसीलदार आशिष बिजवल, उपविभागीय कृषी अधिकारी सातपुते यांच्यासह अन्य मंडळी उपस्थित होती.
 
 
 
पटेल म्हणाले की, ढगफुटी व दुष्काळासारखी संकटे वारंवार येत आहे. त्यामुळे पीकपद्धतीत बदल करणे अनिवार्य आहे. शासनाने त्यासाठी अनेकविध योजनांना चालना दिली आहे. शेतक-यांचे उत्पन्न  २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. शेतकर्‍यांना उच्च प्रतीचे बियाणे, रोपे उपलब्ध होण्यासाठी आयात धोरणात अनुकुल बदल होत आहेत.
 
यावेळी डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. त्यासाठी परिषदेचे आयोजन केले जाते. उत्पादनवाढीपेक्षा उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी शास्त्रीय दृष्टी आत्मसात केली पाहिजे. तालुक्यात सौर ऊर्जा प्रकल्पातून वीजेची समस्या सुटणार असून संत्रा प्रकल्पातून शेतकरी समृद्ध होणार आहे. या कृषी विकास परिषदेतून शेतकर्‍यांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत होणार असून याचा शेतकर्‍यांना निश्चित फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.वसुधा बोंडे यांनी आभार मानले.
 
 
गावोगावी कृषी मार्गदर्शन केंद्राची गरज : अनासपुरे
 
शेतक-यांना शेतीविषयी सल्ला व मार्गदर्शन मिळण्यासाठी गावोगावी कृषी मार्गदर्शन केंद्राची गरज अनासपुरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, भौगोलिक स्थिती, बाजारभाव आदी सर्व बाबींचा विचार करुनच शेती फायद्यात येऊ शकते. तसे मार्गदर्शन केंद्रांद्वारे मिळावे. बहुवार्षिक पीकपद्धतीचा अवलंब करावा, असेही ते म्हणाले. भारत गणेशपुरे म्हणाले की, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बदल आत्मसात केल्याशिवाय शेती समृध्द होणार नाही. शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पन्न वाढवावे. गटशेतीसारखे प्रयोग गावोगावी व्हावेत.