दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा विजय
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
- न्यूझीलंडवर 7 गड्यांनी मात 
 
- मालिका 1-1 ने बरोबरीवर
 
- कृणाल पांड्या सामनावीर
ऑकलंड, 
 
कृणाल पांड्याची प्रभावी गोलंदाजी व कर्णधार रोहित शर्माच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने दुसर्‍या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ७ गड्यांनी दणदणीत विजय नोंदविला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळविली आहे. न्यूझीलंडमधील हा भारताचा पहिला टी-२० विजय ठरला. तीन बळी टिपून न्यूझीलंडचे कंबरडे मोेडणारा कृणाल पांड्या सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिका विजयासाठी आता रविवारी हॅमिल्टन येथे होणारा तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.
 
कॉलिन डी ग्रॅण्डहोम व रॉस टेलरने केलेल्या ७० धावांच्या भागीदारीच्या बळावर न्यूझीलंडने ८ बाद १५८ धावा उभारल्या.
रोहित शर्माच्या दिमाखदार अर्धशतकी खेळीबरोबरच शिखर धवन (३०), ऋषभ पंत (नाबाद ४०) व महेंद्रिंसह धोनीच्या (नाबाद २०) उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताने ७ गडी व ७ चेंडू शिल्लक ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले.
 
 
 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. कृणाल पांड्या व खलील अहमदने अप्रतिम गोलंदाजी करत न्यूझीलंडला १५८ धावांवर रोखले. एकवेळ, ५० धावात ४ महत्त्वपूर्ण फलंदाज गमावल्याने न्यूझीलंड बॅकफूटवर आला. मात्र त्यानंतर रॉस टेलर व कोलीन डी ग्रँडहोमने डाव सावरत न्यूझीलंडला दिडशे धावांचा टप्पा गाठून देण्यास हातभार लावला. ग्रॅण्डहोमने २८ चेंडूत ५० धावा, तर टेलरने ३६ चेंडूत ४२ धावा काढल्या.
 
 
 
भारताला विजयाचे लक्ष्य गाठून देताना कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, ऋषभ पंतन व धोनीने तडाखेबंद फलंदाजी केली. रोहितने २९ चेंडूत ५० काढल्या, यात त्याने ३ चौकार व ४ षटकार खेचले. शिखर धवनने ३१ चेंडूत २ चौकारांसह ३० धावा केल्या. ऋषभ पंतने २८ चेंडूत ४ चौकार व एका षटकारांसह नाबाद ४०, तर धोनीने १७ चेंडूत नाबाद २० धावांची खेळी करत भारताचा विजय साकार केला.