तेलंगणाच्या वाहनाने शेतकर्‍यास चिरडले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
- संतप्त शेतकर्‍यांचा रास्तारोको
 
-रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण स्थिती
 
सुब्बई(चंद्रपूर), 
 
बैलबंडीत तणस भरून पायी चालणार्‍या शेतकर्‍यास पिकअप वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात हिरामण विठोबा धानोरकर याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज राजुरा-विरूर मार्गावर घडली. दरम्यान, घटनेनंतर धडक देणार्‍या वाहनांचा तातडीने शोध घेवून आरोपीला अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. सकाळी ११ वाजेपासून आंदोलन सुरु असून रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
 

 
 
तेलंगणा राज्यातून राजुरा तालुक्यातील कापूस जिनिंगवर कापूस विक्रीसाठी चारचाकी वाहने येत आहे. राजुरा येथील कापूस जिनिंगवर कापूस विक्री करून तेलंगणामध्ये परत जाणार्‍या पिकअप वाहनाने हिरामण धानोरकर या शेतकर्‍यास आज शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चिरडले. घटनेनंतर वाहन चालक वाहनासह पसार झाला. घटनेची माहिती स्थानिक पोलिसाना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मात्र, गावकर्‍यांनी आरोपीला तात्काळ अटक करा, अशी मागणी रेटून धरली. जोवर आरोपीला अटक केली जात नाही, तोवर मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने तणाव कायम होता.