१९वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन उद्यापासून
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
- पक्षीमित्र, पक्षी अभ्यासक, मार्गदर्शकांची मंदियाळी
 
चंद्रपूर,
१९ वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन ९ व १० फेब्रुवारीला चंद्रपुरात आयोजित करण्यात आले असून, इको-प्रो संस्थेतर्फे आयोजनाची तयारी पूर्ण झाली आहे.
 

 
 
या संमेलनाचे उद्घाटक राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पक्षी अभ्यासक गोपाल ठोसर यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पक्षीमित्र डॉ. जयंत वडतकर, संमेलनाचे अध्यक्ष दिलीप विरखडे, विशेष उपस्थिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एन. आर. प्रवीण, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, स्वागताध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मनोहर पाऊनकर, ग्रीन प्लॅनेटचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांची उपस्थिती राहणार आहे.
 
या संमेलनामध्ये विदर्भातील पक्षीमित्र, अभ्यासक, मार्गदर्शक उपस्थित होणार असून, जवळपास १४० पक्षीमित्रांनी नोंदणी केली आहे. हे संमेलन जिल्ह्यातील माळढोक व सारस पक्षी संरक्षण व अधिवास संरक्षणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. दोन दिवस चालणार्‍या या संमेलनामध्ये जिल्ह्यातील पक्षी अधिवास संरक्षण, विदर्भातील माळराने, पक्षी संरक्षण व संवर्धन, शहरी पक्षी अधिवास व सध्यस्थिती, पक्षी व पक्ष्याची अधिवास संरक्षण व संवर्धनापुढील आव्हाने या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. यादरम्यान विविध अभ्यासकाचे प्रेझेंटेशन सादरीकरण होणार आहे.