अंतराळात मानव पाठविण्यासाठी तयारी सुरु; इस्रो आणि हवाईदलची संयुक्त अंतराळ मोहीम
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पुणे
 
अंतराळ क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार इस्रो करत आहे. लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) तर्फे ६७व्या वार्षिक लष्करी वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात भारतीय लष्कराच्या तिन्ही दलातील वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले असून यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी, अंतराळात मानव पाठविण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाले असल्याचे सांगितले. तसेच यासाठी इस्रो आणि हवाईदल यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू झाले असल्याची माहिती पुरी यांनी दिली. 
पुरी म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत अंतराळ मानवाच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत निराकरण आणि येणारी आव्हाने या संदर्भात संशोधन करण्यासाठी बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन यांच्या पुढाकाराने हे काम हाती घेण्यात आले आहे. या संदर्भात इस्रो आणि हवाई दलाच्या मेडिकल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या असून, प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली .
अंतराळ क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी भारताकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. अंतराळात मानव पाठविण्याचा पंतप्रधान यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २०२२ पर्यंत अंतराळात भारतीय मानवाला पाठविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) लवकरच मानवी मोहीम आखली जाणार आहे. भारतीय भूमिवरून भारतीय बनावटीच्या यानाने अंतराळवीर अवकाशात पाठविला जाणार आहे. यात अंतराळात मानवी जीवरक्षक प्रणालीवर भर देण्यात येणार आहे. इन्स्टिट्यूटआॅफ एरोस्पेस मेडिसिन या संस्थेकडे यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असल्याने इस्रोकडून संस्थेची निवड केली आहे.