त्या आगीत ब्राझीलचे- दहा युवा खेळाडू ठार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
रिओ दी जानेरियो :
 
ब्राझीलचे युवा फुटबॉल प्रशिक्षण केंद्र- फ्लेिंमगो अकादमीला लागलेल्या आगीत 10 युवा खेळाडू ठार झालेत. तीन जण जखमी झाले असून यापैकी एक जण 30 टक्के जळल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे ब्राझीलच्या ग्लोबो वेबसाईटने म्हटले आहे. या आगीत मुलांचे वसतीगृह भस्मसात झाले आहे. ज्या जमिनीवर हे वसतीगृह बांधले, त्याला मंजुरी नव्हती तसेच त्याचा मुलांचे निवासस्थान म्हणून वापरण्यासाठीसुद्धा परवानगी नव्हती. आगीचे कारण आम्ही सांगू शकत नाही, त्याच्या चौकशीची गरज असल्याचे फ्लेिंमगोचे अध्यक्ष रॉडोल्फो लॅण्डिम म्हणाले. आगीची सुरुवात आमच्या रूममधून झाली. एअर कंडिशनरला आग लागली आणि मी धावत सुटलो, असे 17 वर्षांखालील संघाचा मिडफिल्डर फेलिप कार्डोसो याने सांगितले. ईश्वराचे आभार. मी धावू शकलो म्हणून जीवंत आहे, असे तो म्हणाला. आम्ही अनेक प्रतिभावान खेळाडूंना मुकलो, याचे अतिशय दुःख वाटते, असे 16 वर्षीय ऑगस्टो मॅथ्यूज म्हणाला.