जनसहभागातून जाहीरनाम्यासाठी भाजपाची जगातील सर्वांत मोठी मोहीम - केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
मुंबई,
भारताचे भविष्य कसे घडावे, हे जनतेच्या सूचनेतून निश्चित होण्यासाठी भारतीय जनता पार्टीने ‘भारत के मन की बात, मोदीजी के साथ’ ही देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. देशभरातील जनतेकडून मिळणार्‍या सूचनांच्या आधारे भाजपाचा लोकसभा निवडणूक जाहीरनामा तयार होणार आहे. जनभागीदारीतून जाहीरनामा तयार करण्याची ही जगातील सर्वांत मोठी मोहीम आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज शनिवारी मुंबईत केले.
 
 
 
 
भाजपाने आयोजित केलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. केंद्रीय अल्पसंख्यक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशीष शेलार, आ. राज पुरोहित व प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.
 
 
 
 
पीयूष गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत लोकसहभागातून विकासकार्याला जनआंदोलन बनवले आहे. त्याचप्रकारे आगामी काळात देशाने कशी वाटचाल करावी व भारताचे भविष्य कसे घडवावे, हे जनतेच्या सूचनांच्या आधारे निश्चित व्हावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यानुसार भाजपाने ही जगातील सर्वांत मोठी संपर्क मोहीम सुरू केली आहे. देशातील तालुका स्तरापर्यंत 7500 सूचना पेट्या भाजपा कार्यकर्ते नेत असून, त्याद्वारे लोकांना आपल्या सूचना देता येतील. देशभरात 400 रथ पाठविण्यात आले असून, त्याद्वारे जनतेला भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती देण्यात येत आहे. जनता टि्‌वटर, फेसबूक इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सूचना पाठवू शकते.
 
 
 
 
जनतेकडून आलेल्या सर्व सूचनांचा अभ्यास राज्य व राष्ट्रीय स्तरावरील गट करतील. त्यानंतर तज्ज्ञांशी बातचित करून या सूचनांच्या आधारे भाजपाचे निवडणूक संकल्पपत्र तयार करण्यात येईल, असे ते म्हणाले.
 
 
 
मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, ‘भारत की मन की बात, मोदीजी के साथ’ या मोहिमेंतर्गत भाजपाचे नेते देशात ठिकठिकाणी भेटी देऊन जनतेच्या सूचना जाणून घेत आहेत. देशभरातील दहा कोटींपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहचून विविध मार्गांनी त्यांचे मन जाणून घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. हा अशा प्रकारचा जगातील सर्वांत मोठा उपक्रम आहे.
 
 
 
दरम्यान, पीयूष गोयल यांनी शनिवारी मुंबईत स्टार्ट अपसंबंधी प्रतिनिधींशी बातचित केली. तसेच समाजातील मान्यवरांशी बातचित करण्याच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून माजी पोलिस महासंचालक अरिंवद इनामदार यांची भेट घेतली.