महामिलावटीपासून सावधान!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
 
 
 
 
गुरुवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्ष कॉंग्रेसला लक्तरे निघेपर्यंत धुतले. स्वत:च्या मान-सन्मानाची चाड असणारा कुणी असता, तर शांत बसून आत्मपरीक्षण केले असते. परंतु, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना, ही चाडही नसल्याचे दिसून येते. दुसर्‍याच दिवशी, चेन्नईच्या द हिंदू नामक भारतविरोधी वृत्तपत्रात जाणीवपूर्वक प्रसिद्ध केलेल्या एका बातमीच्या आधारावर, राहुल गांधी यांनी पत्रपरिषद घेऊन नरेंद्र मोदींवर राफेल करारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आणि पंतप्रधान चोर आहे, याचा पुनरुच्चार केला. काही वेळातच या वृत्ताचा फोलपणा उघड झाला आणि राहुल गांधी पुन्हा एकदा तोंडघशी पडले.
 
खरेतर, धन्यवाद प्रस्तावावरील आपल्या उत्तरात नरेंद्र मोदी यांनी, राफेल करारावर विरोधकांना सडेतोड उत्तर देत, कॉंग्रेस पक्षावर जे अतिशय गंभीर आरोप केले, त्यानंतर राफेल प्रकरणावर पुन्हा तोंड उघडण्याचीही सोय कॉंग्रेसला ठेवली नाही. पंतप्रधान म्हणाले- मी कॉंग्रेसवर गंभीर आरोप करीत आहे. भारतीय हवाई दल सशक्त व्हावे असे कॉंग्रेसला वाटत नाही. राफेल करार रद्द व्हावा असे तुम्हाला का वाटते? त्यामुळे कुणाचा फायदा होणार आहे? कुठल्या कंपनीसाठी तुम्ही हा खेळ खेळत आहात?
 
राफेल करार विनादलाली झालाच नाही, असे सिद्ध करण्याचा अट्‌टहास करणार्‍या राहुल गांधींना फैलावर घेत पंतप्रधान पुढे म्हणाले- कॉंग्रेस आणि त्याचे सत्तेचे भुकेले सहयोगी पक्ष यांनी कधीही काहीही दलालाशिवाय केले नाही, याचा इतिहास साक्षी आहे. राफेल प्रकरणी राहुल गांधी इतक्या आत्मविश्वासाने खोटे कसे काय बोलू शकतात, याचे मला नेहमीच आश्चर्य वाटायचे. नंतर मी तपशिलात शिरलो तर मला आढळले की, कॉंग्रेसच्या सत्ता-लालसी ५५ वर्षांच्या कार्यकाळात, दलालाशिवाय कुठलाही करार झालेला नाही. एवढा गंभीर आरोप आणि तोही सभागृहात आल्यावरही, मीडियाच्या आघाडीवर चिडिचूप अस्वस्थ शांतता आहे. याच्या उलट, प्रियांका वढेरा, आपल्या पतीला अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीसाठी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी कशी गेली आणि ती आपल्या पतीच्या पाठीशी किती ठाम उभी आहे, यावरच्याच चर्चा मीडियात रंगविण्यात आल्या. अशा मीडियाला आम्हाला ‘राष्ट्रीय’ म्हणावे लागते, किती दुर्दैवाचे आहे!
 
केवळ नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी, महागठबंधन नामक एक धडपड सुरू आहे. त्याचीही पंतप्रधानांनी जबरदस्त खिल्ली उडविली आहे. हे महागठबंधन नसून, महामिलावट (अतिशय भेसळ) आहे. जनता अशा महामिलावटी सरकारला कधीही पसंत करणार नाही, असे ठणकावून सांगितले. मिश्रण वेगळे असते आणि भेसळ वेगळी असते, हेच मोदींना सांगायचे आहे. भेसळीमध्येही मिश्रण असते, परंतु ते आरोग्याला अपायकारक असते. प्रसंगी जिवावरही बेतणारे असते, असा सावधगिरीचा इशाराच जणूकाही मोदींनी दिला आहे. ही भेसळही प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे. या महाभेसळीतील घटक वेगवेगळ्या राज्यात बदलत असले, तरी त्याचा घातकपणा मात्र तसूभरही कमी होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. केरळात कॉंग्रेसच्या या महाभेसळीत कम्युनिस्ट पक्ष सामील होणार का? ओडिशात कॉंग्रेससोबत बिजद येणार का? तेलंगणात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव या महाभेसळीत येणार का? उत्तरप्रदेशात तर सपा-बसपा यांनी कॉंग्रेसच्या या महाभेसळीला नाकारून स्वत:चीच एक नामी भेसळ तयार केली आहे. बंगालमध्येही तृणमूल व कम्युनिस्ट कॉंग्रेसला सोबत घ्यायला तयार नाहीत. कर्नाटकात तर भेसळीतील दोन घटक- कॉंग्रेस व जनता दल (एस) आतापासूनच साठमारी करायला लागले आहेत. अशा स्थितीत ही महाभेसळ तयारच कशी होणार, हा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमक्या याच वास्तवावर आपल्या भाषणातून बोट ठेवले आहे.
 
मोदी सरकार घटनात्मक संस्थांना नष्ट करत आहे, असा आरोप, भ्रष्टाचाराच्या खटल्यात जामिनावर मोकळे असलेल्या चिदम्बरम्‌पासून, लोकांनी निवडूनही न दिलेल्या आपल्या पत्नीला मुख्यमंत्री बनविणार्‍या लालूप्रसादपर्यंत सर्व जण करीत असतात. मोदी म्हणाले, विरोधी पक्षांची लोकनियुक्त सरकारे बरखास्त करण्यासाठी कॉंग्रेसने ३५६ कलमाचा शंभर वेळा वापर केला आहे. त्यातही इंदिरा गांधींनी ५० वेळा केला आहे. देशावर आणिबाणी लादली इंदिरा गांधींनी आणि संस्था नष्ट करण्याचा आरोप होतो मोदींवर! भारतीय लष्कराला बदनाम कुणी केले? कॉंग्रेसने, अन्‌ ते म्हणतात की मोदी संस्था नष्ट करत आहे. कॉंग्रेस लष्करप्रमुखाला गुंडा म्हणते, कॉंग्रेसचे तत्कालीन मंत्री भारतीय लष्कर सरकारविरुद्ध बंड करीत असल्याच्या बातम्या पेरतात, आरोप मात्र मोदींवर होतात! निवडणुका जिंकता येत नाहीत तर ईव्हीएम मशीनवर ठपका ठेवला जातो.
 
भारतीय निवडणूक आयोगाची जगभर प्रशंसा होत असते. इकडे मात्र कॉंग्रेस पक्ष या आयोगालाच बदनाम करण्याच्या खटपटीत असतो. भारतीय न्यायव्यवस्थेला बदनाम करण्यात कॉंग्रेस आघाडीवर आहे. अनुकूल निकाल आले नाहीत म्हणून सरन्यायाधीशांविरुद्ध महाभियोग आणण्याची धमकी कॉंग्रेस देते आणि ते म्हणतात, मोदी संस्थांना नष्ट करत आहे. योजना आयोगांना त्यांचा पंतप्रधान विदूषकांची संस्था म्हणतो, आरोप मात्र मोदींवर लागतात. तुम्हाला झाले आहे तरी काय, असा प्रश्न मोदींनी विरोधकांना उद्देशून विचारला तेव्हा विरोधकांचे चेहरे बघण्यालायक झाले होते.
 
सत्ताभोगींची ५५ वर्षांची कारकीर्द आणि सेवायोगीचे ५५ महिने, यांची सविस्तर तुलनाच मोदींनी या भाषणात मांडली. ५५ महिन्यांच्या आपल्या कारकीर्दीतील एकेक उपलब्धी आकडेवारीनिशी मांडून नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांचे इतके कपडे उतरवले की, अब्रू झाकण्यासाठीही काही ठेवले नाही. नरेंद्र मोदींचे या लोकसभेतील धन्यवाद प्रस्तावावरील हे शेवटचे भाषण होते. या भाषणातून मोदींनी आगामी निवडणुकीच्या प्रचाराचे अधिकृत रणिंशग फुंकले, असेही म्हणता येईल. कुठलाही असंसदीय शब्द न वापरता किंवा वादग्रस्त विधान न करता विरोधकांना लोळागोळा कसे करता येते, याचा हे भाषण एक वस्तुपाठच ठरावा.
 
जनतेने ३० वर्षे केंद्रात आघाड्यांचे सरकार बघितले आहे. या सरकारांमुळे देशाचे किती नुकसान झाले, हेही बघितले आहे. त्यानंतर २०१४ साली जनतेने केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निर्णायक बहुमताचे सरकार स्थानापन्न केले. त्याचा अनुभव बघता २०१९ साली जनता, पुन्हा आघाडी सरकारकडे वळण्याची हिंमत करणार नाही. इतकी पुण्याई मोदी सरकारने निश्चितच अर्जित केली आहे. सत्तारूढ सदस्यांना उद्देशून मोदी म्हणाले की, चिंता करू नका. महामिलावटी सरकार सत्तेत येणार नाही. मतदारांच्या लक्षात आले आहे की, महामिलावटी सरकारमुळे देशाचे किती नुकसान होत असते. जेव्हा निर्भेळ बहुमताचे सरकार असते, तेव्हा त्याची कामगिरी निश्चितच वेगळी असते. याचाही अनुभव मतदारांनी घेतला आहे. त्यामुळे कोलकाता येथे जे लोक एकत्र आले होते, त्यांचे महामिलावटी सरकार केंद्रात आणण्याचा मतदार विचारही करणार नाही. नरेंद्र मोदी यांचा या भाषणातील हा जबरदस्त आत्मविश्वास, २०१९ सालच्या निवडणुकीच्या निकालांची दिशा कशी असेल, हे सांगून जातो, असेच म्हणावे लागेल.