पक्षी संवर्धनासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ राबविणार - नितीन काकोडकर यांचे प्रतिपादन - 19 व्या विदर्भ पक्षीमित्र संमेलनाचे थाटात उद्घाटन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
चंद्रपूर,
’वेब आँफ लाईफ’ या साखळीतील प्रत्येक घटक महत्वाचा आहे. कुठल्याही घटकाला धोका निर्माण होऊ नये. पक्षी संवर्धनासाठी वनविभाग एक ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ राबविणार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह अन्य अभयारण्यातही वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा मानस असून, वनविभागाची एक चमु तयार केली जाईल, असे मत राज्याचे प्रधान मुख्य संरक्षक(वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी व्यक्त केले.
 

 
 
 
 
इको-प्रो संस्थेच्या वतीने चंद्रपुरातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात दोन दिवसीय 19 व्या विदर्भ पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन शनिवार, 9 फेब्रुवारी रोजी थाटात पार पडले. त्यावेळी नितीन काकोडकर उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पक्षी अभ्यासक गोपाल ठोसर होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयंत वडतकर, संमेलनाध्यक्ष दीलीप विरखडे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन. आर. प्रविण, स्वागताध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, ग्रीन प्लॅनेटचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांची उपस्थिती होती.
 
 
काकोडकर यांनी, राज्यात पक्षी चळवळीचे महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेच्या वतीने गेली 38 वर्षापासून तर विदर्भस्तरावर 19 वर्षापासून काम सुरू आहे. पक्षी संवर्धनासाठी पक्षीमित्र संस्थांचे योगदान महत्वपूर्ण असल्याबद्दल त्यांनी संस्थांचे कौतुक केले. पक्षी संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी मांडले.
 
 
गोपाळ ठोसर यांनी , मोजक्या लोकांपासून सुरू झालेली पक्षी चळवळ आज समाजात बर्‍यापैकी रूजली. अनेक पक्षी अभ्यासक निर्माण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. छायाचित्रकार पक्ष्यांचे फोटो काढतात. त्या फोटांचे महत्व आहेच. पण, फोटो काढताना आपण, त्यांच्या संवर्धनासाठी काय करतो, याचा विचार छायाचित्रकारांनी करावा, असे आवाहन केले. दिलिप विरखडे यांनी, पक्षीमित्र चळवळीचे पक्षी संवर्धन बाबतीत योगदान विषद करून पक्षी अधिवासास असलेले धोके व त्यावर उपाय, यावर मत मांडले. डॉ. जयंत वडतकर यांनी, पक्षी संवर्धनासाठी पक्षी चळवळ ही अनेक वर्षापासून कार्यरत असून, अलिकडे पक्षी व त्यांचे अधिवास संवर्धन हे मोठे आव्हान चळवळी समोर आहे. यासाठी ही चळवळ अधिक व्यापक व्हावी. समाजातील अनेकांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.
 
 
यावेळी ’माळढोक’ स्मरनिका, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडून त्रैमासिक पक्षी विशेषांक, अकोला जिल्ह्य ई-चेकलिस्ट चे प्रकाशन मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय निबंध व चित्रकला स्पर्धेचे पुरस्कार वितरण करण्यात आले. संचालन प्रशांत आर्वे यांनी तर आभार प्रा. योगेश दुधपचारे यांनी मानले.