दिव्यांग वैशाली व अनिलचा शुभविवाह थाटात - सामाजिक बांधीलकीतून कार्य शुभकार्य - खासदार अडसुळ दाम्पत्याचे कन्यादान
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
अमरावती,
परतवाड्याजवळच्या वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, बेवारस बालगृहात लहानाच्या मोठ्या झालेल्या वैशाली व अनिल या दिव्यांगांचा शुभविवाह शनिवार 9 फेब्रुवारीला सांयकाळी श्रीहव्याप्र मंडळाच्या भव्य प्रांगणात मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडला. वधु-वरला आशिर्वाद देण्यासाठी सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक, क्रिडा व अन्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. मुलीच्या कन्यादानाची जबाबदारी खासदार आनंदराव अडसुळ व मुलाच्या वडील म्हणून पोलिस आयुक्त संजय बाविस्कर यांनी जबाबदारी स्विकारली होती.
 
 
 
 
त्यामुळे या सामाजिक लग्न सोहळ्याचा हळदीचा कार्यक्रम शुक्रवारी खा. अडसुळ यांच्या घरी झाला. शनिवारी दूपारी 5 वाजताच्या दरम्यान नवरदेव टाऊन हॉल येथून राशी काढण्यात आला. शंकरबाबा पापळकर, पालकत्व स्विकारणारे संजय बाविस्कर, अनाथ व बालगृहातील सर्व मुले-मुली आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. वाजत-गाजत व फटक्यांच्या आतषबाजीत नवरदेव राजकमल, गांधी चौक मार्गे लग्नस्थळी पोहचला. तेथे वधू पक्षाकडून नवरदेवाचे स्वागत करण्यात आले. सांयकाळी सात वाजताच्या सुमारास मंगलाष्टके सुरू झाली. उपस्थित सर्वांना अक्षदा वधु-वरावर टाकल्या. फटाक्यांच्या आतषबाजीत व टाळ्यांच्या कडकडाटात लग्न लागले. शंकरबाबा पापळकर यांची वैशाली 20 वी मानसकन्या आहे. 1 वर्षाची असताना चेंबूर येथे सापडली होती. तसेच अनिल हा 19 वा मानसपुत्र आहे. 6 महिन्याचा असताना भेंडी बाजार मुंबई येथे सापडला होता.
 
 
 
या दोघांचेही पालन पोषण वझ्झर येथील बालगृहात शंकरबाबांनी केले. उपवर झालेल्या या दोघांचाही विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आज तो थाटात पार पडला. खासदार आनंदराव अडसुळ व मंगला अडसुळ यांनी वैशालीचे कन्यादान केले. मुलाचे मामा विभागीय आयुक्त पियुष सिंह, मुलीची मावशी आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर, मुलाचे मोठे भाऊ जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, मुलीचे मोठे भाऊ शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, मुलीचे काका पुरुषोत्तम हरवाणी आणि मुलीच्या मामा शिवप्रभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील भालेराव होते. या सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडली. या विवाह सोहळ्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री प्रवीण पोटे, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, डॉ. कमलताई गवई, आ. सुनील देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सुर्यवंशी यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. संत गजानन महाराज संस्थान शेगांव यांच्या सहयोगाने या विवाह सोहळ्यात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
 
 
प्रशसंनीय नियोजन व आयोजन
दिव्यांग वैशाली व अनिलचा शुभविवाहात कशाची कमतरता नव्हती. उत्तम नियोजन करण्यात आले होते. समाजतल्या अनेक घटकांनी या सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतला होता. सर्व सामान्यांचे जसे विवाह होतात त्यापेक्षाही धुमधडाक्यात हा विवाह पार पडला.
 
 
‘सोबतीचा करार’
यावेळी शिवप्रभु प्रतिष्ठानच्या वतीने पुणे येथील रसिक प्रस्तुत ‘सोबतीचा करार’ हा मराठी गझल व गीतांचा कार्यक्रम झाला. कवी वैभव जोशी, गायक दत्तप्रसाद रानडे व संगीतकार आशीष मुजुमदार यांनी तो सादर केला.