आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘आक्रोश’
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
अमरावती,
‘अगोदर आरक्षण, मग सरकार’ अशी घोषणा देत शनिवारी जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी अमरावतीत आक्रोश आंदोलन केले. या आंदोलनानिमित्त जिल्हाभरातील शेकडो धनगर बांधवांनी इर्विन चौक येथे ठिय्या दिला.
 
 
 
 
धनगर आरक्षण समितीच्या वतीने आयोजित या आक्रोश आंदोलनात खासदार विकास महात्मे, धनगर नेते संतोष महात्मे प्रामुख्याने सहभागी झाले. इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला खासदार विकास महात्मे यांनी हार अर्पण केला. त्यानंतर आंदोलनस्थळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यावर आंदोलनाला सुरुवात झाली.
 
 
यावेळी धनगर समाजातील तरुण, वृद्ध, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आता धनगर समाजाला आधी आरक्षण मिळेल त्यानंतरच निवडणूक आणि नवीन सरकार येईल, असा निर्धार यावेळी करण्यात आला. खासदार विकास महात्मे यांनी केंद्र सरकार धनगरांना आरक्षण देण्याच्या तयारीत असून येत्या 25 दिवसांत धनगरांना आरक्षण मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. आजचे आंदोलन हे सर्वसामान्य समाज बांधवांनी आयोजित केले आहे. समाजाच्या भावनेची दखल सरकारला घ्यावी लागेल असेही खासदार महात्मे म्हणाले.
 
 
आंदोलनस्थळी आमदार यशोमती ठाकूर, नवनीत राणा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा ठाकरे, नगरसेवक दिनेश बूब यांच्यासह अनेकांनी भेट दिली. या आंदोलना दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इर्विन चौक येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला.