आमचे रस्ते 200 वर्षे सुरक्षित : गडकरी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
अयोध्या,
 
 
माझ्या मंत्रालयाने देशभरात मजबूत रस्त्यांचे जाळे तयार केले आहे आणि या रस्त्यांवर आगामी 200 वर्षांपर्यंत एकही खड्डा पडणार नाही, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला. शरयू नदीत जलमार्ग विकसित केला जाणार असून, यामुळे वाराणसीमार्गे बांगलादेशचा प्रवास करणेही शक्य होणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
 
 
रस्ते तयार करताना आम्ही गुणवत्ता याच एकमेव निकषाचे पालन केले. कंत्राटदारांसोबत कोणतीही तडजोड केली नाही आणि करणारही नाही. हे रस्ते दीर्घकाळ टिकणारे आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. उत्तरप्रदेशच्या पूर्वेकडील भागात 632 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासह सुमारे 7,195 काटी रुपयांच्या विविध विकासात्मक प्रकल्पांचे भूमिपूजन गडकरी यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जे काम गेल्या 70 वर्षांत झाले नाही, ते आम्ही 5 वर्षात करून दाखविले आहे, असेही ते म्हणाले.
 
 
उत्तरप्रदेशचा झपाट्याने विकास होत आहे. सिमेंट आणि कॉंकि‘टचे रस्ते तयार होत आहेत. या रस्त्यांवर 200 वर्षे खड्डे पडणार नाही, कारण आम्ही दर्जाशी कोणतीही तडजोड करीत नाही. मागील दौर्‍यात ज्या प्रकल्पांची मी घोषणा केली होत, त्यांचे काम सुरू करण्यासाठी मी येथे आलो आहो. आता ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन झाले, त्यावर पुढील दोन महिन्यात वेगाने काम सुरू होईल, असे गडकरी म्हणाले.
 
 
ऑस्ट्रेलियाहून एअरबोट आणणार
 
ऑस्ट्रेलियातू मी लवकरच एअरबोट आणणार आहो. ही एअरबोट पाण्यात लॅण्ड होऊ शकणार आहे. पुढील काळात मी जेव्हा येथे येईल, तेव्हा एअरबोटनेच. ही एअरबोट वाराणसी ते प्रयागराज या दरम्यान प्रवास करणार आहे. याशिवाय, पाण्यावर चालणारी डबल डेक्कर बसही सुरू करण्याची आमची योजना आहे, असे गडकरी यांनी सांगितले.